जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला लागले गालबोट
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सत्तेची समीकरणे अधिक मजबूत करावयाचे असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी आपल्याच विचारांचा विजय झाला पाहिजे या निर्धाराने झपाटलेल्या भाजपा व प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकमेकांच्या आमने-सामने आले. विचारांची लढाई विचारानेच करावयाचे असते हा लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला मंत्रच आजच्या काळातील नेतेमंडळी विसरून गेले. परिणामी या निवडणुकीत झुंडशाहीचा बोलवाला पहिला मिळाला. राजकारणात कोणीच कोणाचा मित्र व कोणीच कुणाचा शत्रू नसतो हे जरी खरे असले तरी सत्तेच्या खुर्चीसाठी जो तो वाटेल त्या थराला पोचू शकतो हे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिसून आले. यशवंत विचाराच्या बालेकिल्ल्यात झुंडशाही विचाराने आता थैमान घातले आहे . गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय पटलावर या विचारांची सध्या लागण झाली आहे. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाण्याची जनू काही तीव्र स्पर्धाच सुरू असल्याचे घडणाऱ्या घटनेवरून दिसून येते. राजकीय निष्ठा तत्त्व व प्रामाणिकपणा हे शब्द आता राजकीय पटलावरून कालबाह्य ठरले आहेत. पैसा सत्ता यासाठी निष्ठेचा त्याग करणारे मंडळीचा वावर राजकारणात अधिक झाल्याने निष्ठा व प्रामाणिकपणाची भावना आता लुप्त झाली आहे. राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत असलेल्या सातारा जिल्ह्यात आता झुंडशाहीचा उदय झाला असून तत्त्वनिष्ठेचे राजकारण हे गुळगुळीत झाले आहे जिकडे पैसा सत्ता तिकडे धावाधाव अशी मानसिकता आता राजकीय मंडळींची झाल्यामुळे विकास व प्रगतीच्या गर्जना फक्त निवडणुकीपुरतीच उरले आहे. एकेकाळी सातारा जिल्हा परिषदेने संपूर्ण राज्यात एक आदर्श कार्य प्रणालीच्या आधारे कामे करून व सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा पाडून संपूर्ण राज्यात जिल्ह्याचे नाव कोरले होते. त्याच जिल्ह्यात त्याच जिल्हा परिषदेमध्ये 20 मार्च 2026 रोजी झालेला राजकीय राडा पाहून जिल्हा वासिय सुन्न झाले आहेत. सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेले रणकंदन हे निश्चित दुर्दैवी बाब आहे. सातारा जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा व परंपरा वाढवण्यासाठी एकेकाळी असंख्य नेत्यांनी मोठे योगदान दिले त्याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदा साठी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना शंभुराजे देसाई यांना आपले रक्त सांडावे लागले हे दुर्दैवी बाब आहे. उमेदवारांची पळवा पळवी त्याचप्रमाणे दहशत हे खरे तर सातारा जिल्ह्याचे संस्कृती नाही आजच्या घटनेने मात्र या परंपरेला गालबोट लागला आहे. पालकमंत्री ना शंभूराजे देसाई ना मकरंद पाटील या अनुभवी नेत्याना जिल्हा प्रशासनाने दणका दिला. अर्थात ज्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन काम करते त्याच प्रशासनाने दिलेला दणका नक्कीच ना शंभुराजे देसाईंना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. या निवडणुकीत प्रथमपासूनच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे ठामपणे सांगत होते सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हा भाजप विचारांचाच होणार तीच भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची होती अखेर या दोघांनाही आपला शब्द सत्यात उतरून दाखवला हे जरी खरे असले तरी आजच्या घडलेल्या घटनेतून जिल्ह्यातील राजकीय समीकरण मात्र बदलणार यात तीळ मात्र ही शंका नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सबसे आगे है हम हे दाखवून दिले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय परिपकवता दाखवत जो बोलतो ते मी करून दाखवतो हे सिद्ध केले. अर्थात निवडणुकीतील जे पराजय हे होत असतात पण प्रथमच सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात झुंडशाही प्रवृत्तीचा उदय झालेला दिसून आला विचारांची लढाई विचारांनी करायची असते या विचाराला या निवडणुकीत मूठ माती मिळाली हे तितकेच खरे आहे.
श्रीरंग काटेकर सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





