कृष्णोत्सवात रंगला ‘महिला सन्मान’ सोहळा!
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाई नगरपरिषद आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर, औषधोपचार आणि महिला सन्मान कार्यक्रमाला वाई शहरातील व परिसरातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कृष्णोत्सव मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात आरोग्य जागरणासोबतच महिला सक्षमीकरणाचा नवा उत्साह पाहायला मिळाला.
ग्रामीण रुग्णालय वाई यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी भोसले, साक्षी कन्स्ट्रक्शनच्या संचालिका सरिताताई सावंत, ॲड. दिप्ती पिसाळ, किमिन्स हायस्कूलच्या उपप्राचार्या तेजल सावंत, माजी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, नगराध्यक्ष अनिल सावंत आणि उपनगराध्यक्ष घनःश्याम चक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. केवळ आरोग्यच नव्हे, तर महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या महिला बचत गटांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरणावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पद्मा जाधव-पाडळे यांच्यासह समिती सदस्या दिपाली सावंत, डॉ. जागृती पोरे, अपर्णा जमदाडे (सभापती पाणीपुरवठा), केतकी मोरे (सभापती वैद्यकीय व स्वच्छता), नूतन मालुसरे (सभापती शिक्षण) व ज्योती गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मा जाधव यांनी केले, सूत्रसंचालन केतकी मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. दिपाली सावंत यांनी मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




