विष्णुमय जग | वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम | अमंगळ - संत तुकारामाच्या अभंगातील मानवतावादी दृष्टिकोन

तुकाराम बीज निमित्त डॉ.वाल्मीक भावराव गवळी यांचे विशेष संपादकीय
Tukaram seed, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news.

 संत तुकारामांची अभंगवाणी महाराष्ट्राचे एक अमूल्य असे वैचारिक धन आहे, सर्वसामान्यापासून ते विद्वानापर्यंत त्यांची अभंगगाथा सर्वांना आकृष्ट करून घेते, लोकमानसात इतका दृढपणे रूजलेला दुसरा संतकवी नाही. तुकोबांच्या प्रत्यक्ष साक्षीदार संत ‌बहिणाबाई तर अभंगगाथेचा 'तुकाराम वेद' म्हणून गौरव करतात. तुकोबा हे मुळातच समाजचिंतक असल्यामुळे त्यांनी अत्यंत डोळसपणे व चपखलपणाने अभंगवाणीतून सामाजिक विचारांचा महान वारसा समाजाला दिला, त्यांच्या अभंगाचा हेतूच लोकोद्धार व समाजोद्धार असल्याने समाजातील प्रत्येक बारीक- सारीक गोष्टीकडे त्यांचे जाणीवपूर्वक लक्ष वेधले गेले.

तुकारामांच्या काव्याचा 'माणूस' हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाच्या कल्याणासाठी जे जे करता येईल,ते ते त्यांनी केले, त्यांच्या अभंगवाणीतून व्यक्त होणारा मानवतावादी दृष्टिकोन हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा प्राण आहे, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेता नव्या आत्मविश्वासाने पुनरमांडणी करताना त्यांनी ईश्वराचे अस्तित्व गोर - गरीब, रंजल्या- गांजलेल्यांच्या सेवेत पाहिले, मानवाचा खरा धर्म व नीतीमार्ग सांगताना ते आपल्या अभंगात म्हणतात,
"आईका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे."
कोणाचाही मत्सर न करणे हीच ईश्वर सेवा असून सर्वांची प्रेमाने, आपुलकीने वागल्यास ईश्वरसेवा आपोआपच घडते असे जनसामान्यावर तुकोबांनी बिंबवले, आपले हित आपणच जाणले पाहिजे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात,
"आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान"
जगातील मोह,माया पासून दूर राहून स्वतःचे हित जाणल्याने मनाला एक समाधान लाभते, थोडक्यात माणसाने माणसासारखे वागले पाहिजे हे तुकोबाच्या मानवतावादी विचारांचे सार आहे. मानवतेची व समानतेची पायाभरणी करून विश्वकुटुंबाची अपेक्षा करणारे ज्ञानदेवादी संतांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची रुजवणूक करून मानव कल्याणासाठी सत्यधर्म हाच मानवधर्म सांगितला.
देशाला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झाली, तरीही लोकशाही मूल्याची पायमल्ली होताना आपण पाहतो,आदर्श समाजरचना निर्माण करण्यास आपण कुठेतरी कमी पडताना दिसतो, अशा वेळेस संतसाहित्यच तारक ठरू शकते.आजही समाजातील जाती- धर्मावर आधारित विषमता, कटूता मिटलेली दिसत नाही, महापुरुषांच्या नावावर राजकारण करून संवेदनशील तरुणांच्या भावना भडकविण्याचे कार्य होताना दिसते. गणेशोत्सवासारखे उत्सवाचे स्वरूप किती बीभत्स आणि कुरुप होत चालले हे सांगण्याची गरज नाही, ही अवस्था मूल्यांच्या ऱ्हासामुळे व नीतीमूल्यांच्या अभावामुळे समाज भरकटून गेल्याचे दिसून येते,अशावेळी आपल्या अभंगवाणीतून तुकोबांनी मानवाला त्याच्या स्वरूपाची प्रत्यक्ष यथार्थ दर्शन घडवून, सर्वांनी भेदाभेद बाजूला सारून समानता व बंधुता ह्या मुल्याच्या दृष्टीने अद्वैत तत्त्वज्ञान मांडून जनकल्याणाच्या भुमिकेतून तत्कालीन काळात संदेश दिला तो आजही दिशादर्शकाची भूमिका साकारतो.
विष्णुमय जग | वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम | अमंगळ

डॉ.वाल्मीक भावराव गवळी
नेहरू माध्य व उच्च माध्य विद्यालय सावखेडा, छ.संभाजीनगर

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !