मंत्री मकरंद आबा यांची माहिती; शेतकऱ्यांना दिलासा, कृषी विकासाला नवी दिशा
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कवठे-केंजळ उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथमच कवठे तलावात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना अखेर पूर्णत्वास आल्याने शेतीला नवसंजीवनी मिळणार असून कृषी विकासाला नवी चालना मिळेल, अशी माहिती राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
कवठे, केंजळ तसेच आसपासच्या गावांतील शेतजमिनींना या योजनेमुळे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक क्षण ठरला आहे.
“ही योजना साकार करण्यासाठी संबंधित अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि चिकाटीमुळेच आज तलावात पाणी पोहोचवणे शक्य झाले,” असे मंत्री मकरंद आबा यांनी नमूद केले.
तलावात पाणी दाखल होताच परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असून भविष्यातही अशा योजनांना प्राधान्य दिले जाईल, असेही मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




