खंडाळा तालुक्यातील भादे येथील गायकवाड मळा परिसरात छुप्या पद्धतीने केलेली अफूची शेती शिरवळ पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ९७ हजार ८७५ रुपये किमतीचा ७ किलो ९१५ ग्रॅम अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी अशोक दगडू गायकवाड (वय ६३, रा. गायकवाड वस्ती, भादे, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना भादे येथील जमीन गट क्रमांक ४८० मध्ये प्रतिबंधित अफूची लागवड केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फॉरेन्सिक पथक आणि शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन वेगवेगळ्या शेतांमध्ये अफूच्या बोंड्यांसह ओलसर आणि वाळलेली झाडे आढळून आली. खंडाळा न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई खंडाळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या उपस्थितीत पार पडली. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली. पोलीस अंमलदार अक्षय बगाड यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करत आहेत.
दरम्यान, अमली पदार्थांचे उत्पादन किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन यशवंत नलवडे (पोलीस निरीक्षक, शिरवळ) यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




