'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमने मृतदेह बाहेर काढला
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. किल्ल्यावरून साधारण २०० फूट खोल दरीत कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून, 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. संबंधित कामगार दरीत कोसळल्याचा कॉल आल्यानंतर टीमने दोरखंड आणि जीवरक्षक साहित्यासह दरीत उतरून शोधमोहीम राबवली. मात्र, दरीची खोली आणि पडताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत ट्रेकर्सनी या कामगाराचा मृतदेह दरीतून वर काढला असून तो आता पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हा कामगार नेमका कशामुळे पडला आणि तो किल्ल्यावर कोणत्या कामासाठी आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी आणि कामगारांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




