देवांश गायकवाडची सैनिकी विद्यालयात निवड
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर (कन्नड) येथील इयत्ता ५ वीचा विद्यार्थी चि. देवांश उमेश गायकवाड याने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित सैनिकी विद्यालयात प्रवेश मिळवून शाळेचा तसेच गावाचा नावलौकिक उंचावला आहे. अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण प्रवेश प्रक्रियेत यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब मानली जात असून, देवांशच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवांश हा अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. लहान वयातच त्याने देशसेवेची भावना मनात ठेवून सैनिकी शिक्षणाची दिशा निवडली आहे. त्याच्या या यशामागे त्याची स्वतःची जिद्द, पालकांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत देवांशचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक श्री प्रकाश जिरेमाळी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देवांशच्या कर्तृत्वाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड, उपाध्यक्ष रामदास सुरडकर, सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्षा सरला सोनवणे, संचालक शिवाजी वाघ, संचालक मुकुंद शिंदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी देवांश व त्याच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.
देवांशच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भविष्यातही असेच यश मिळवत देवांश देशसेवेत मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




