प्रशासक कल्याणराव चव्हाण यांचा आडगाव भुमे येथे सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
पिशोर : घाटमाथ्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिशोर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग हा निधोना–फुलंब्री मार्गे जातो. अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती व सुधारणा व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर आता देवगिरी साखर कारखाना ते गौर पिंपरी या सुमारे २१ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
या कामासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, देवगिरी साखर कारखान्याचे प्रशासक कल्याणराव चव्हाण तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर लाभार्थी गावांतील प्रतिनिधींनी आडगाव भुमे येथे कल्याणराव चव्हाण यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन विशेष सत्कार केला.
प्रशासक कल्याण चव्हाण यांनी या भागात रस्त्यांसह शेती व शिक्षणाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याचा मानस व्यक्त केला. “रस्त्यासह शेती आणि शिक्षण ही भारताच्या प्रगतीची विशेष महत्त्वाची आधारस्तंभ आहेत. या दोन्ही क्षेत्रांचा विकास झाला तर.सबंध भारताचा सर्वांगीण विकास शक्य होईल,” असे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी लेखक आणि व्याख्याते प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होत असताना कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होणार नाही, हे पहावे अशी अपेक्षा विनंती केली.
या प्रसंगी लाभार्थी गावातील संजय भुमे, पंढरीनाथ भुमे, प्रा. राजेश भावसार, प्रा. मनोज मोकासे, प्रा. जे. एस. पाटील, ह.भ.प. डॉ. विलास तायडे, दत्ता मोरस्कर, सुरेश कोल्हे, साळूबा मोकासे, बापूसाहेब छत्रे, मारुती धोंडकर, एकनाथ भुमे, मनोहर गायकवाड, दत्तू पुंडे पाटील, बबन थोरात, नाना साबळे, डॉ. सुधाकर जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्कारानंतर उपस्थितांमध्ये नादरपूर फाट्यापर्यंत उर्वरित रस्त्याचे कामही लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या मार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे फुलंब्री तालुक्यातील रेलगाव, पिंपळगाव, कान्होरी, लिहा, सीताबाईची वाडी, आडगाव, डोंगरगाव, शिरोडी, निधोना, वावना, लालवन, नायगाव आदी गावांतील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. तसेच कन्नड तालुक्यातील चिंचोली लिं., करंजखेड, वासडी, घाटशेंद्रा, टाकळी, लोहगाव, दिगाव, वाकद, शेलगाव, जामडी, बरकतपूर, रायपूर, गणेशपूर, बालखेडा, देवपूळ, वाकी, पिशोर, पळशी बु., पळशी खु., रामनगर, तपोवन, निंभोरा, मोहाडी, जवखेडा बु., जवखेडा खु., नादरपूर, पिंपरखेडा, शफियाबाद, भिलदरी, गौर पिंपरी आदी गावांतील नागरिकांचीही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.
या अतिशय महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील गावांचा छत्रपती संभाजीनगरशी संपर्क अधिक सुलभ होऊन विकास आणि वाहतुकीस मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




