थकबाकीदारांचे धाबे दणाणले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास काहीच दिवस शिल्लक देऊ असल्याने वाई नगरपरिषदेने थकीत कर वसुलीसाठी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. वारंवार सूचना देऊनही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी शहरातील विविध भागांतील ६ नळ कनेक्शन तोडण्याची मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
नगरपरिषदेच्या महसुलाचा मुख्य कणा असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि गाळा भाड्याची वसुली अत्यंत कमी असल्याने प्रशासनाने वसुली आणि जप्ती पथके तैनात केली आहेत. शहरातील पायाभूत सुविधा जसे की रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्तीची कामे ही केवळ नागरिकांनी भरलेल्या करावर अवलंबून असतात. त्यामुळे पालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
जे मालमत्ताधारक मुदतीत कर भरणार नाहीत, त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ नुसार कडक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता सील करणे व जप्त करणे, पाणीपुरवठा कायमस्वरूपी खंडित करणे, थकबाकीदारांच्या घरासमोर 'हलगी' वाजवून जाहीर वाभाडे काढणे, शहरातील मुख्य चौकांमध्ये थकबाकीदारांच्या नावाचे फ्लेक्स लावणे. याचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्या शहरात जप्ती पथक सक्रिय असून, पुढील काही दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाईकरांनी लवकरात लवकर पालिकेच्या कार्यालयात जाऊन आपला कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, "नगरपरिषदेमार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा दर्जा राखण्यासाठी वेळेवर कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी आणि शहराच्या विकासकामात सहभाग नोंदवण्यासाठी नागरिकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळा भाड्याची रक्कम तात्काळ जमा करावी," असे आवाहन संजीवनी दळवी (मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद) यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




