ठेकेदाराची मुजोरी, प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष आणि धुळीच्या साम्राज्यामुळे जनता आक्रमक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईकरांच्या मुख्य मागण्या
दर्जेदार काम: रस्ता किमान पुढील ५० वर्षे टिकेल अशा तांत्रिक पद्धतीने (PQC) करावा.
धुळीवर नियंत्रण: नागरिकांच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी-संध्याकाळी पाणी मारणे अनिवार्य करा.
तज्ज्ञ देखरेख: कामाच्या ठिकाणी 'TPL' एजन्सीचे जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी २४ तास उपस्थित ठेवावे.
देयके रोखा: कामाचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि तांत्रिक निकष पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये.
दोषींवर कारवाई: नियम धाब्यावर बसवणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई व्हावी.
गेल्या दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेले सुरूर-पोलादपूर रस्त्याचे काम आणि वाई-मांढरदेव रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाईकरांसह तालुक्यातील नागरिकांचे जगणे आता असह्य झाले आहे. ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराविरोधात आज (सोमवार) वाई नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेली सर्वपक्षीय बैठक वादळी ठरली. "हा रस्ता आहे की कोरोनाचा दुसरा अवतार?" असा संतप्त सवाल करत, आता केवळ निवेदने नाही तर प्रत्यक्ष 'आरपार'ची लढाई लढण्याचा निर्धार वाईकरांनी केला आहे.
यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, सुरेश कोरडे, प्रशांत डोंगरे, अशोक लोखंडे, दीप्ती पिसाळ, ॲड. विजयसिंह पिसाळ, तेजपाल वाघ, सागर मालुसरे, यशवंत जमदाडे, जितेंद्र पिसाळ, नगरसेविका पद्मा जाधव - पाडळे, केतकी पाटणे, अपर्णा जमदाडे, जागृती पोरे, दीपाली सावंत, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, नगरसेवक विजय ढेकाणे, प्रसाद बनकर, सचिन सावंत यांच्यासह वाई शहरातील तसेच तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूर ते वाई दरम्यानच्या कामात 'NP Infra' आणि सबलेट घेतलेल्या 'KLN' कंपनीने तांत्रिक नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केली आहे. नियमानुसार अत्याधुनिक पेव्हर मशीनने काम करणे बंधनकारक असताना, एखाद्या घराचा 'कोबा' करावा तसे फावड्याने आणि लाकडी पट्ट्यांनी काँक्रिट पसरवले जात असल्याचा गंभीर आरोप रोहित वाडकर यांनी या बैठकीत केला. साईटवर प्रशिक्षित इंजिनिअर नाही आणि देखरेख करणारी 'TPL' एजन्सीही बेपत्ता असल्याने 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी अवस्था झाली आहे.
रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वाईकरांचा श्वास कोंडला आहे. महिला, लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे गंभीर विकार जडले असून जनावरांना चारा खाणेही मुश्कील झाले आहे. शेतीपिकांचे नुकसान झाले असून हॉटेल व्यावसायिक आणि टपरीधारकांचे धंदे 'धुळीत' मिळाले आहेत. एसटीचे मार्ग बदलल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सदरच्या कामाबाबत ठेकेदाराला तक्रार करून काम बंद ठेवण्याची मागणी केली असता, स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे वाई तालुक्यातील ग्रामस्थांची उघडपणे चेष्टा होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या बैठकीला भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र, दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या जनहिताच्या बैठकीकडे फिरवलेली पाठ आणि व्यापारी महासंघाला विश्वासात न घेता पुकारलेला 'वाई बंद' यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व वाई तालुका व्यापारी तसेच वाई-सुरूर आणि वाई-मांढरदेव रस्त्यालगत असणारे व्यावसायिक करणार असून येत्या बुधवारी सकाळी ११ वा. मोर्चा काढत निवेदन देण्यात येणार असून संपूर्ण वाई शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ही बैठक नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली खरी, मात्र हा विषय नगरपालिकेचा आहे का? वाई शहरात आंदोलनाविषयी बंद ठेवणार आहेत म्हणून कोणाच्या पुढाकाराने रिक्षा फिरवली? या आंदोलनाचे नेतृत्व नेमकं कोण करणार आहे? सभागृहात व्यासपीठावर नगराध्यक्ष यांच्या शेजारी इतर लोकांना बसण्यासाठी खुर्च्या का दिल्या? नेमकं आंदोलन प्रशासनाच्या विरोधात आहे की आणखी कोणाच्या? असे एक ना अनेक प्रश्नाची चर्चा बैठक संपल्यानंतर सभागृहात दबक्या आवाजात सुरू होती.
"आम्हाला चांगला रस्ता हवा आहे, ठेकेदाराची मनमानी नाही. ५० वर्षे टिकेल असा दर्जा राखला जात नसेल, तर हे काम थांबवून दोषींवर गुन्हे दाखल करावे लागतील. आता दबावाला न जुमानता कृती समितीच्या माध्यमातून जाब विचारला जाईल!"
- अनिल सावंत,
नगराध्यक्ष, वाई.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




