तरुणांच्या खांद्यावर आता सुरक्षेची मोठी जबाबदारी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ग्रामसुरक्षा दलाची मुख्य कर्तव्ये
पोलिसांच्या सोबतीने गावात रात्रभर गस्त घालणे.
चोरी, दरोडे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नात पोलिसांना तातडीने सहकार्य करणे.
बेकायदा दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांची गुप्त माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे.
नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या काळात ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाणे.
गावांतर्गत गस्तीचे चोख नियोजन करणे.
ग्रामीण भागातील शांतता, सुव्यवस्था आणि चोऱ्यांच्या सत्राला लगाम घालण्यासाठी भुईंज पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील २६ गावांमध्ये 'ग्रामसुरक्षा दलाची' स्थापना करण्यात आली असून, गावातील तरुणांच्या खांद्यावर आता सुरक्षेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी भुईंज पोलीस ठाण्यात हद्दीतील पोलीस पाटीलांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गावोगावच्या तरुण रक्ताची 'ग्रामसुरक्षा दलात' निवड करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यात आली.
वाढत्या चोऱ्या आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ पोलीस बळ पुरेसे ठरत नाही, यासाठी स्थानिक तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. २६ गावांतील पोलीस पाटीलांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना 'विशेष पोलीस अधिकारी' म्हणून मिळणारे हक्क आणि संरक्षणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
अनवडी, खोलवडी, देगाव, आनेवाडी, पांडे, खडकी, गुळूम, भिवडी, धोम पुनर्वसन, चांदवडी, राऊतवाडी, केंजळ, वेळे, कवठे, सुरूर, रायगाव, उडतरे, वीरमाडे, चांदक, ओझर्डे, निकमवाडी, काळंगवाडी, पाचवड, महामूलकरवाडी, मापरवाडी आणि राऊतवाडी अशा २६ गावांत हे दल सज्ज झाले असून, उर्वरित गावांतही लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
"गावात कोणाही अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. ग्रामसुरक्षा दलामुळे पोलिसांचे हात अधिक बळकट होतील आणि गुन्हेगारांवर वचक बसेल."
- पृथ्वीराज ताटे
(सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस ठाणे)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




