ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यावरील पुलाचे कठडे गायब - बांधकाम विभागाच्या भूमिकेमुळे अपघाताचे सावट

मोठ्या अपघाताची वाट बघताय का? ग्रामस्थांचा संतप्त सवाल; महाबळेश्वर-पाचगणीची वाहतूक याच मार्गे.

Negligence of the Public Works Department, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )

ओझर्डे (ता. वाई) येथील चंद्रभागा ओढ्यावरील पुलाचे कठडे मागील पाच-सहा महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून, या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या कॉर्नरवरील कठडे पूर्णपणे कोसळल्याने वाहन थेट ओढ्यात पडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून, "एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?" असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

     सध्या वाई-सुरुर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सातारा-पुणे महामार्गाकडून महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणारे हजारो पर्यटक, एसटी बसेस आणि खासगी वाहने याच ओझर्डे मार्गावरून धावत आहेत. याशिवाय वाई एमआयडीसीत जाणारे गॅसचे मोठे टँकर आणि अवजड कंटेनरची याच पुलावरून दिवसरात्र वर्दळ असते. पुलाची रुंदी आणि वाढलेली रहदारी पाहता, तुटलेले कठडे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहेत.

     गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या पुलाचे कठडे तुटलेले आहेत. रात्रीच्या वेळी नवीन चालकांना किंवा पर्यटकांना या धोक्याचा अंदाज येत नाही. पुलाच्या कोपऱ्यावरच संरक्षक भिंत नसल्याने दुचाकी किंवा चारचाकी वाहन ताबा सुटल्यास थेट खोल पात्रात कोसळू शकते. इतका गंभीर प्रश्न असतानाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप साधी पाहणी करण्याची तसदीही घेतलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

     "या पुलावरून शालेय बस, टँकर आणि हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. प्रशासनाला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर येथे एखादा दुर्दैवी अपघात झाला, तर त्याला सर्वस्व बांधकाम विभाग जबाबदार असेल," अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

     प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यावरील पुलाच्या कठड्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !