शेकडो नागरिकांना घरपोच दाखल्यांचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत शिरवळ मंडल स्तरावरील 'समाधान शिबिर' शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी कै. तुकाराम संतोबा कबुले हॉल येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने आपली सेवा थेट जनतेच्या दारात आणली असून, एकाच छताखाली शेकडो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (पुनर्वसन) नंदकुमार कोष्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, सातारा विशेष भूसंपादन अधिकारी अभिषेक देशमुख आणि खंडाळ्याचे तहसीलदार सुहास थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या अर्चनाताई यादव, सरपंच रविराज दुधगावकर, माजी सभापती राजेंद्र तांबे, माजी उपसरपंच अमोल कबुले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह शिरवळ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या शिबिरासाठी जय्यत तयारी केली होती, ज्याचा फायदा शिरवळ मंडळातील गावांना झाला. एकूण ८७० विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले, ७०५ डिजिटल ७/१२ आणि २५९ '८अ' उताऱ्यांचे वितरण झाले, १४१ फेरफार निकाली काढले असून, सातबारा दुरुस्तीचे ४२ अर्ज स्वीकारण्यात आले, १२१ अर्जांवर जागीच कार्यवाही करण्यात आली. तसेच शिबिरात भूसंपादन व अकृषक (NA) परवानगीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून गाव दप्तर अद्यावत करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शिरवळचे मंडल अधिकारी एम. आर. डोईफोडे, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत, पुरवठा विभागाच्या स्मिता आगाशे, निवडणूक नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी आणि विविध गावांतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी (तलाठी) विशेष परिश्रम घेतले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




