गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
हिंगणगाव (धनगरवाडी) ता. फलटण येथील दोन सुपुत्रांनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात (Indian Army) प्रवेश मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अक्षय कुंडलिक झिटे आणि हणमंत साहेबराव शिंदे अशी या यशस्वी जवानांची नावे असून, त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण आहे.
अक्षय आणि हणमंत या दोन्ही तरुणांनी शालेय जीवनापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा नसताना, केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर त्यांनी सैन्य भरतीची कठीण प्रक्रिया पार केली. पहाटेचा सराव, मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेतील सातत्य यामुळेच त्यांनी हे यश खेचून आणले आहे.
या यशाचे औचित्य साधून हिंगणगाव (धनगरवाडी) ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही जवानांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन जवानांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जवानांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले.
"गावातील तरुणांसाठी हे दोघेही खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहेत. मातीतील तरुणांनी अशाच प्रकारे देशसेवेसाठी पुढे यावे, हीच आमची इच्छा आहे." अशी भावना यावेळी हिंगणगाव (धनगरवाडी) ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील अनेक तरुण सध्या विविध क्षेत्रांत करिअर करत आहेत, मात्र देशसेवेसाठी सैन्य दलाची निवड करणाऱ्या अक्षय आणि हणमंत यांनी इतर युवकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील इतर तरुणही आता सैन्य भरतीसाठी जोमाने तयारीला लागले आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




