वाई शहर अन् तालुक्यात 'होळी रे होळी, पुरणाची पोळी' चा उत्साह; लहानग्यांचा जल्लोष
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात होळीचा सण उत्साहात आणि पारंपरिक रिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’च्या घोषणांनी रात्री वाईच्या गल्ल्या गल्ल्या दुमदुमून गेल्या होत्या. यंदाच्या होळीमध्ये तरुणांसोबतच अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
वाई शहरातील विविध पेठांमध्ये आणि चौकांमध्ये होळीची उभारणी करण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास विधिवत पूजा करून होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी नारळ अर्पण करून आणि होळीला नैवेद्य दाखवून सुख-समृद्धीचे साकडे घालण्यात आले. होळीच्या ज्वाळांनी आसमंत उजळून निघाला होता.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे लहान मुले. होळीच्या भोवती फेर धरून 'बोंबा' मारण्याची पारंपरिक प्रथा लहानग्यांनी मोठ्या उत्साहात जपली. "बोंबा मारत" होळीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या मुलांच्या उत्साहामुळे वातावरणात एक वेगळीच रंगत आली होती. काही ठिकाणी मुलांनी धावत जाऊन होळीला अभिवादन केले.
वाईच्या ग्रामीण भागातही या सणाचा मोठा उत्साह दिसून आला. गावागावांतील ग्रामदेवतेच्या समोर मुख्य होळी पेटवण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारंपरिक गाणी आणि वाद्यांच्या गजरात हा सण साजरा केला. होळीच्या या उत्साहानंतर आता वाईकर उद्या होणाऱ्या 'धुळवडी'साठी सज्ज झाले आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




