जिल्हा पुरवठा अधिकारी मा. वैशाली राजमाने यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना थेट वाहतुकीद्वारे (Direct Delivery) येणाऱ्या धान्य वाटपातील अडचणींबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मा. वैशाली राजमाने यांना सादर करण्यात आले.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहरी भागातील रेशन दुकानदारांना Food Corporation of India (एफसीआय) गोडाऊनमधून धान्य थेट वाहतुकीने दिले जात आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार तालुका गोडाऊनपासून १५ किलोमीटर अंतरातील दुकानदारांनाही थेट वाहतुकीचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
आक्षेप पुढीलप्रमाणे :
अनेक ठिकाणी वाहतूक ठेकेदारांकडून धान्य पोत्यांचे वजन करून दिले जात नाही. काही गाड्यांमध्ये वजन काटे नसल्याचे किंवा ते बिघडले असल्याचे सांगितले जाते.
वजन करून देण्याची मागणी केल्यास हमालांकडून पैसे मागितले जातात. तसेच फाटकी पोती शिवून न देता तशीच देण्यात येतात, त्यामुळे धान्य सांडून दुकानदारांचे नुकसान होते.
शासन नियमानुसार ५० किलो धान्याबरोबर ज्यूट बारदान असल्यास ५०० ग्रॅम, तर प्लास्टिक बारदान असल्यास ३०० ग्रॅम अतिरिक्त वजन असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र नियमानुसार वजन मिळत नसल्याची तक्रार आहे.
धान्य कमी आल्याने तपासणीवेळी स्टॉक तुटीचे आक्षेप घेऊन दुकानदारांवर कारवाई केली जाते, त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
काही तालुक्यांत वजन करून धान्य दिले जात असले तरी सर्वत्र एकसमान पद्धत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या त्रुटी दूर होईपर्यंत थेट वाहतुकीद्वारे धान्य वितरणास विरोध असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
तथापि, शासन नियमानुसार वजन केलेले, शिवलेली पोती आणि प्रत्येक वाहनात कार्यरत वजन काटा उपलब्ध असल्यास थेट वाहतुकीने धान्य स्वीकारण्यास दुकानदार तयार असल्याचेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. तसेच धान्य पोती उतरवताना किंवा वजन करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह सातारा जिल्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले हे निवेदन प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




