अपघाताचा बनाव फसला
शिवशाही वृत्तसेवा,बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
सुपारी देऊन पतीने मित्राच्या मदतीने केली पत्नीची हत्या
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे अपघाताचा बनाव करून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाच्या कारणावरून पतीनेच मित्राच्या मदतीने पत्नीच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करत संपूर्ण कट उघडकीस आणला आहे.
२ मार्च २०२६ रोजी वृषाली प्रकाश गावंडे, रा. पातुर्डा ता. संग्रामपूर या आपल्या स्कूटी क्रमांक MH 28 AL 5815 ने पिंपळगाव काळे येथे ड्युटीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र मयत वृषाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीकुमार पाटील आणि तपास अधिकारी स्नेहा शेडगे यांनी सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे उघड झाले. तपासात समोर आले की वृषाली यांचा पती प्रकाश गावंडे याने मित्र मंगेश चहुळकर यांच्या मदतीने मंगेश सूर्यवंशी, रा. शेगाव याला पत्नीच्या खुनाची सुपारी दिली होती.
घटनेच्या दिवशी आरोपींनी ठरल्याप्रमाणे वृषाली यांच्या स्कूटीला वाहनाने जोरदार धडक देत त्यांचा खून केला आणि तो अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर वृषाली यांचा शारीरिक व मानसिक छळ होत होता. यापूर्वीही त्यांच्या पतीविरुद्ध कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र तडजोड झाल्यानंतर त्या पुन्हा पतीसोबत राहण्यास आल्या होत्या. दरम्यान पती प्रकाश गावंडे सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होता आणि याच वादातून हा खून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सुपारीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




