वाईच्या भाजी मंडईचा चेहरामोहरा बदलणार - प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भाजी मंडईला शिस्त लावण्यासाठी आता वाई पोलीस प्रशासन आणि वाई नगरपरिषद सरसावली आहे. मंडईतील विस्कळीतपणा दूर करून वाहतूक कोंडीमुक्त आणि स्वच्छ परिसर करण्यासाठी दोन्ही प्रशासनांच्या वतीने संयुक्तपणे पाहणी व सर्व्हे करण्यात आला. या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मंडईच्या प्रश्नाला आता गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महत्त्वपूर्ण मोहिमेवेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, नगरसेवक प्रसाद बनकर यांच्यासह वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, पोलीस हवालदार रुपेश जाधव, गोरखनाथ दाभाडे आणि ५ होमगार्ड उपस्थित होते. मंडईतील प्रत्येक कोपऱ्याची पाहणी करून प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
रस्ते अडवणाऱ्या बेवारस टपऱ्या आणि शेड काढून टाकण्यासाठी व्यापाऱ्यांना ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार असून त्यानंतर थेट कारवाई केली जाणार आहे. मंडईत शिस्तबद्धता आणण्यासाठी पट्टे मारून मार्किंग केले जाणार आहे. ठरवून दिलेल्या जागेच्या बाहेर दुकान लावल्यास दंड आकारला जाणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी संपूर्ण मंडई परिसर 'वन वे' केला जाणार असून, प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'बूम बॅरियर' बसवण्यात येणार आहेत. मंडईत आता टपऱ्यांसाठी ६x८ ही प्रमाणभूत साईज निश्चित करण्यात आली असून अभ्यासाअंती साधारण २ रुपये प्रति स्क्वेअर फूट याप्रमाणे भाडे आकारणीचे नियोजन आहे. शहरासाठी तातडीने स्वतंत्र 'अतिक्रमण विभाग' स्थापन करून बेकायदा बांधकामे व अडथळ्यांवर नियमित कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, भाजी मंडईमध्ये केवळ भाजी विक्रेत्यांनाच स्थान असेल, इतर दुकाने लावण्यास सक्त मनाई असेल. विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाने थेट कारवाई करण्यापूर्वी व्यापारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी दोन दिवस रिक्षा फिरवून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीनंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास विशेष पथकाद्वारे कडक दंड वसुली आणि जप्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे वाईकरांनी समाधान व्यक्त केले असून, भाजी मंडई खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




