संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळात शांतता राखण्याच्या उद्देशाने दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी वाई शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त 'रूटमार्च' (संचलन) काढले. नवी मुंबई येथील आर.ए.एफ. १०२ बटालियनच्या जवानांनी भरघोस संख्येने यात सहभाग नोंदवल्याने शहरात सर्वत्र शिस्तीचे आणि सुरक्षेचे दर्शन घडले.
सकाळी १०:३० वाजता सुरू झालेला हा रूटमार्च शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला. यात किसनवीर चौक, जामा मशीद, ताहेरशा मशीद, चावडी चौक, दातार हॉस्पिटल, ब्राह्मणशाही, आमंत्रण चौक, गणपती घाट आणि छोटा पूल या मार्गांचा समावेश होता. जवानांच्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या रूटमार्चमध्ये RAF १०२ बटालियन मधील ४३ अंमलदार आणि ५ विशेष वाहने. मुख्यालय RCP मधील १ अधिकारी आणि ८ अंमलदार आणि
वाई पोलीस ठाण्यातील १ अधिकारी, १२ अंमलदार आणि १० होमगार्ड. असा ताफा होता.
रूटमार्च दरम्यान आर.ए.एफ. जवानांना वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणे, मर्मस्थळे, धार्मिक स्थळे, मिश्र लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसराची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, परिसरातील राजकीय व सामाजिक संघटना, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांची ओळख करून देण्यात आली.
सकाळी ११:५० वाजता पोलीस ठाणे येथे या रूटमार्चची सांगता झाली. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना देऊन संचलनाचा समारोप करण्यात आला.
दरम्यान, शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण राहावे, यासाठी हे संचलन आयोजित करण्यात आले असल्याचे वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




