‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन २०२६’ परिषदेचे दिमाखात उद्घाटन; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि. १७ : “जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात महाराष्ट्र आणि मुंबईचे धोरणात्मक महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के योगदान देणारा महाराष्ट्र आता जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार ठरणार असून, आगामी काळात जागतिक आर्थिक स्थैर्य घडवण्यात राज्याची भूमिका निर्णायक असेल,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि फ्युचर इकॉनॉमिक को-ऑपरेशन कौन्सिल (FECC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ (GEC) परिषदेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उद्योजक बाबा कल्याणी, सायरिल श्रॉफ, विजय चौथाईवाले यांच्यासह जागतिक स्तरावरील धोरणकर्ते उपस्थित होते.
जगासाठी भारत आशेचा किरण : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
या परिषदेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात भारताच्या वाढत्या शक्तीचा गौरव केला. “अनिश्चिततेच्या काळात जग स्थिर नेतृत्वाच्या शोधात असताना भारत आशेचा किरण ठरला आहे. डिजिटल पायाभूत सुविधा आणि पारदर्शकतेच्या जोरावर भारताने जागतिक आव्हानांवर व्यावहारिक उपाय शोधले आहेत. आज भारत ‘ग्लोबल साऊथ’चा आत्मविश्वासपूर्ण आवाज बनला आहे,” असे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
महाराष्ट्राची आर्थिक शक्ती (ठळक मुद्दे):
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणादरम्यान राज्याच्या आर्थिक क्षमतेची आकडेवारी मांडली:
- जीडीपी योगदान: भारताच्या जीडीपीमध्ये १४ ते १५% वाटा.
- औद्योगिक उत्पादन: देशाच्या उत्पादनात २०% वाटा.
- कंटेनर वाहतूक: पश्चिमेकडील बंदरांतून होणाऱ्या एकूण वाहतुकीपैकी ६०% वाटा
- गुंतवणूक: परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र देशात अव्वल
भविष्यातील रणनीती : AI आणि ग्रीन एनर्जी
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र आता केवळ पारंपारिक उद्योगांवर अवलंबून न राहता एआय (AI) पार्क, डेटा सेंटर क्लस्टर, सेमिकंडक्टर साखळी आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’चा (IMEC) मुख्य आधारबिंदू ठरेल.
‘डी-रिस्किंग’ हाच मंत्र : डॉ. एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, कोविड आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा वेळी भारत हा एक ‘विश्वासार्ह भागीदार’ म्हणून जगासमोर आला आहे. ‘विकसित भारत २०४७’ कडे वाटचाल करताना भारत आता केवळ उत्पादनच नाही, तर संशोधन आणि डिझाइनमध्येही प्रगती करत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




