वाई नगरपालिका, व पोलीस प्रशासन यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील वाहतुकीच्या संदर्भात पोलीस व पालिका प्रशासन चालढकल करीत असल्याने वाईकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा वाई शहरातील रस्त्यावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून अतिक्रमणामुळे रस्त्यांसह वाई शहराचा स्वास गुदमरतोय, खड्ड्यांमुळे आधीच वाईतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार-चाकी, दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना साधे चालता सुध्दा येत नाही.
वाई पोलिसांच्या वतीने प्रत्येक चौकात वाहनांचे पार्किंग केल्यास गाडीचा नंबर पुकारण्यात येवून गाड्यांवर कारवाई केली जात होती तेही बंद करण्यात आल्याने गाड्या कुठेही पार्किंग केल्या जात आहेत. व पोलीस प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तुटवडा असल्याने वाई तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात असून वाईत श्वास गुदमरतोय अशी परिस्थिती झाली आहे अल्पवयीन मुले कशीही मोटर सायकल फोर व्हीलर वाहने बेधारकपणे चालवत असल्याने पोलिसांचा धाकच उरला नाही नावाला फक्त पोलीस अधिकारी वाई शहरांमध्ये असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे पोलिसांचा वाईकर नागरिकांना कसलाही धाक राहिला नाही तसेच पालिकेची गाड्यांच्या पार्किंगची सोय नसल्याने वाई शहरात येणाऱ्या गाड्यांचे पार्किंगचे काय हाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
गणपती घाटावरती तीन ठिकाणी गाडी पार्किंग केली जाते परंतु त्या पार्किंगच्या मुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असते त्यामुळे मोठी वाहनांची रांग लागलेली असते किसनवीर चौक आणि आमंत्रण चौक या ठिकाणी पोलीस सुरक्षा रक्षक फक्त नावाला असतात अर्धे तर मोबाईल मध्येच गुंतलेले असतात त्यामुळे वाहनधारकांना अओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, गणपती आळी, रामडोह आळी या सारख्या अनेक गल्ल्यातून गाडींचे पार्किंग करण्यात येते, गल्लीतील सोसायटींच्या समोर स्वतःचे पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातायत, त्यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे.
अतिक्रमणासह सध्या वाई शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच सध्या नवीन पुलावर गाड्या मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने वाहतुकीला कसलीही शिस्तच राहिली नाही. पोलिसांचं दुर्लक्ष तुटपंजा पोलीस फौज फाटा पोलीस अधीक्षकांचे वाई शहरावर नसलेलं लक्ष त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे, तसेच निवडणुका चालू झाल्याने कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत, अनेक ठिकाणी पालिकेने जागा नियोजित केल्या परंतु त्याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत, शहरातील मुख्य रस्त्यावर वाई एसटी बसस्थानक ते विराट नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात वाहने उभी केली जातात, रस्ता रुंदीकरणाचा उद्देशाच पाठीमागे पडल्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे, अतिक्रमण होवून सुध्दा पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने वाईकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाई शहरातील मुख्य रस्त्यांवर व शहराच्या मुख्य चौकात या बाबी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. किसनवीर चौकात-ते-चित्रा टॉकिज मुख्य रस्ता, महागणपती मंदीर समोरील चौकात, किसनवीर चौक ते जैन मंदीर, किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना, बावधन नाका ते विराट नगर पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, व इतर दुकानदारांनी फुटपाथ वरच आपला ठिय्या मांडून धंदा करीत आहेत, त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दु-चाकी उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरासह उपनगरात सुध्दा दुकानदारांचे नावाचे बोर्ड व जाहिरात फलक हे रस्त्यावर ठेवल्याने नागरिकांना चालताना जीवमुठीत घेवून चालावे लागते. मालांनी भरलेली वाहने कधीही कोठेही माल उतरविण्यासाठी उभी असतात, त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. याचा नाहक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
वाई शहरात सध्या विविध प्रकारच्या अतिक्रमणाविषयी जोरदार चर्चा चालू आहे. बांधकाम संबधित प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालू असून शहरात अनेक ठिकाणी पार्किंग न सोडताच बांधकाम चालू आहेत. रस्त्याच्या बाजूचे बांधकाम पुरेशी जागा न सोडताच कुणाचीही भीती नसल्याने चार मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. खड्ड्यांनी तर रस्त्यांचा जीवच काढला आहे. अनेक वेळा वाईकरांशी सल्लामसलत करण्यासाठी दोन्ही प्रशासनाने आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये चर्चे शिवाय काहीही झाले नाही. त्यावर कोणत्याही ठोस उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. नियोजन बैठका हा निव्वळ फार्स ठरला आहे. एकंदरीत वाईच्या अतिक्रमणाचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपात असताना पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने “कुठे नेवून ठेवली आहे वाई माझी” असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी पालिका प्रशासनाला धडक कारवाई करावी लागणार आहे.
एसटी बसस्थांनकासमोर रस्ता रुंदी करण होवूनही कुचकामी
वाई एसटी बसस्थानकासमोर वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने चौपदरीकरण करून रस्ता रुंद केला परंतु बसस्थानका समोर असणाऱ्या हॉटेल्स व इतर दुकानदारांमुळे पाचगणी-महाबळेश्वरला जाणारे पर्यटक रस्त्यावर गाडी उभी करून खरेदी करतात. सर्व वाहने रस्त्यावरच उभी असतात त्यामुळे रस्ता रुंद होवूनही कुचकामी ठरला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी लागणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करावी लागणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



