पोलीस अधीक्षकांनी मैदानावर प्रत्यक्ष रंगीत तालीम घेतली
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024–25 अंतर्गत उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक 11/02/2026 पासून सुरू होणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया गोकुळ पोलीस कवायत मैदान, एन–10, पोलीस मुख्यालय, टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पार पडणार आहे.
या भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा. अन्नपूर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक तसेच श्री. गौतम पातारे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) यांनी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम घेतली.
यावेळी 100 मीटर व 1600 मीटर धावणे, गोळाफेक, उंची–छाती मोजमाप, नोंदणी काउंटर, RFID वेळ नोंदणी, बायोमेट्रिक स्कॅन, उमेदवारांची हालचाल, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश–निर्गमन मार्ग, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व नियंत्रण कक्ष आदी प्रत्येक टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा सूचना देण्यात आल्या.
या भरती अंतर्गत पोलीस शिपाई 49 व बॅण्डस्मन 04, अशी एकूण 53 पदे भरली जाणार असून, त्यापैकी 18 पदे महिलांसाठी राखीव आहेत. यासाठी एकूण 4341 अर्ज प्राप्त झाले आहेत.
भरती प्रक्रिया तटस्थ, पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित राहणार असून, यावर मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र हे दक्षता अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार आहेत.
संपूर्ण चाचणीची व्हिडीओग्राफी, CCTV देखरेख, बायोमेट्रिक नोंदणी व RFID प्रणाली वापरण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक यांचे आवाहन
मा. डॉ. विनयकुमार राठोड यांनी उमेदवारांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे की, निवड प्रक्रिया केवळ गुणवत्तेच्या आधारेच होणार आहे. कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा आमिषांना बळी पडू नये. या भरती प्रक्रियेत कोणाचाही वशीला, ओळख, दबाव किंवा शिफारस चालणार नाही. कोणीही भरती करून देतो असे प्रलोभन देत असल्यास तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद दिनांकास सकाळी 05:00 ते 09:00 वाजेपर्यंत मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 09:01 नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
प्रवेशपत्र, तीन फोटो, अर्जाची छायांकित प्रत तसेच आधार/पॅन/मतदार ओळखपत्र यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे.
भरतीदरम्यान मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्रतिबंधित असून, गैरवर्तन, डमी उमेदवार, वशिलेबाजी, उत्तेजक द्रव्य सेवन आढळल्यास तात्काळ अपात्रता व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
स्पाईक शूज वापरण्यास मनाई आहे. याच प्रमाणे वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
बाहेरगावच्या उमेदवारांसाठी कैलास शिल्प सभागृह येथे विनामूल्य मुक्काम सोय करण्यात आली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



