प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता!
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील संरक्षण भिंत सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत असून कोणत्याही क्षणी ती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत कोसळल्यास मोठी जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान होण्याची 100 टक्के शक्यता असूनही प्रशासन डोळे झाकून बसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती वाई यांचे बांधकाम विभाग याच इमारतीत कार्यरत असतानाही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दररोज शेकडो नागरिक या परिसरातून ये-जा करत असतात. पावसाळा जवळ आलेला असताना भिंतीला मोठमोठे तडे गेले असून ती अक्षरशः ताठ उभी आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे "पाहू, चौकशी करू" अशी केवळ कागदी उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र ही भिंत कोसळेपर्यंत वाट पाहण्याची मानसिकता अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
जर उद्या एखादी दुर्घटना घडली, एखाद्याचा जीव गेला किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? याची संपूर्ण जबाबदारी थेट संबंधित बांधकाम विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राहील, हे आजच स्पष्ट सांगणे गरजेचे आहे.
ही भिंत तात्काळ पाडून नव्याने बांधण्यात यावी किंवा मजबूत संरक्षणात्मक उपाय त्वरित राबवावेत, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दुर्घटना झाल्यानंतर चौकशी नव्हे, तर दुर्घटना होण्यापूर्वी कारवाई हाच खरा विकास!
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




