वाईच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वैभवाचा हुंकार २५ जानेवारीपासून भव्य वाई महोत्सव
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दक्षिण काशी अर्थात वाई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा भव्य 'वाई महोत्सव' येत्या २५ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'ग्लोबल' व्यासपीठ मिळवून देणे आणि स्थानिक सुप्त कलागुणांना वाव देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या कुरडया, पापड, लोणची, मसाले यांसारख्या दर्जेदार उत्पादनांना केवळ गल्लीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना मेट्रो शहरांमधील बाजारपेठ आणि डी-मार्ट सारख्या मोठ्या साखळी स्टोअर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी हा महोत्सव एक भक्कम आधार ठरणार आहे.
२५ जानेवारी (दिवस १) रोजी सकाळी १० वा. पाच ऐतिहासिक गडांची पवित्र माती आणि पंचनद्यांचे जल पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन होईल. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात येईल. संध्याकाळी ५ वा. महिलांसाठी 'होम मिनिस्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ जानेवारी (दिवस २) रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात येईल. याच दिवशी 'कलाकार कट्टा' अंतर्गत वाईतील सोलो आणि ग्रुप डान्सर्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.
२७ जानेवारी (दिवस ३) रोजी पारंपरिक संस्कृतीची जोपासना करण्यासाठी 'लोकप्रबोधन' हा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये भारूड आणि पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य फूड फेस्टिवल. ग्रामीण भागातील अस्सल चवी आणि शहरातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामुळे लघुउद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून पर्यटकांनाही वाईच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता येईल.
नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून, प्रशासनावर कोणताही भार न टाकता हा महोत्सव स्वत:चे योगदान आणि लोकवर्गणीतून साकारला जात आहे. सुमारे १५ लाख रुपयांचे बजेट असलेल्या या सोहळ्यासाठी स्थानिक उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
नगरपालिकेच्या मागील बाजूस बचत गटांचे स्टॉल आणि मंडई परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत व आयोजकांकडून करण्यात आले आहे.
वाई शहराला ऐतिहासिक वारसा आहे, तो जपतानाच इथल्या माता-भगिनींच्या हाताला काम आणि सन्मान मिळावा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा महोत्सव केवळ शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यातील नागरिकांसाठी आहे. एप्रिलपासून पाचगणी-महाबळेश्वरला पर्यटकांचा ओघ सुरू होतो. त्यापूर्वीच जानेवारी ते मार्च या काळात वाईच्या उत्पादनांना आणि संस्कृतीला जागतिक ओळख मिळवून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
अनिल सावंत (नगराध्यक्ष वाई नगरपरिषद, वाई)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



