मंत्री मकरंद पाटलांच्या वाई विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीला धोबीपछाड - मंत्री जयकुमार गोरेंचे धक्कातंत्र
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू होताच सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)सह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ला मोठा हादरा बसला असून, भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी 'धक्कातंत्र' अवलंबत विरोधकांची गणिते बिघडवली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आता आचारसंहिता लागताच या हालचालींना वेग आला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी गुप्त बैठकांचा धडाका लावला असून, दोन्ही राष्ट्रवादीचे अनेक 'मातब्बर' चेहरे लवकरच कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भगदाड पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यामुळे खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, विरोधकांनी दिलेला हा 'धोबीपछाड' आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.
एकीकडे भाजपची ताकद वाढत असताना, दुसरीकडे पक्षांतर्गत कलहाची टांगती तलवारही आहे. बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, 'नवा विरुद्ध जुना' असा संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास स्थानिक पातळीवर नाराजी नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांची ताकद आणि योग्य रणनीती हीच भाजपची ओळख आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वरच्या विकासासाठी अनेक जण आमच्या सोबत येत आहेत अशी, माहिती राजकीय वर्तुळातील सूत्रांकडून मिळत आहे.
आगामी दोन दिवस खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



