अनेकांची गणिते बिघडणार
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
पश्चिम भागातील धावली गावचे सुपुत्र तसेच धावली–मालतपूरच्या सरपंच सौ. दिपाली तुळशीदास वाडकर यांचे पती, युवा नेते तुळशीदास वाडकर यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी अभेपुरी गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याने संपूर्ण पश्चिम भागातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले तुळशीदास वाडकर हे दांडगा जनसंपर्क, प्रचंड अभ्यास आणि लोकांच्या प्रश्नांशी असलेली थेट नाळ यामुळे ओळखले जातात. कोणत्याही पक्षाच्या झेंड्याआड न लपता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पश्चिम भागातच नव्हे तर पाहुणेरावळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर असलेला जनसंपर्क त्यांच्या ताकदीचा कणा ठरत असून, मतांची भक्कम बेरीज करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही केवळ औपचारिक नसून थेट धक्का देणारी व चक्रावून टाकणारी उमेदवारी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सामाजिक कार्य, जनहिताची कामे, युवकांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि प्रश्नांची सखोल जाण यामुळे तुळशीदास वाडकर हे भविष्यात युवकांचे आशास्थान म्हणून ओळखले जातील, असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.
त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि जमिनीवरील कामाचा अनुभव पाहता, या निवडणुकीत अनेकांना चपराक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष तुळशीदास वाडकर यांची एंट्री म्हणजे पश्चिम भागातील राजकीय समीकरणे ढवळून काढणारा निर्णायक टप्पा ठरणार, यात शंका नाही.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



