निष्ठावंताने सोडली साथ, आता भाजपच मांडणार वाईत नवा थाट!
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ज्यांना 'पवार कुटुंबाचे डोळे आणि कान' मानले जायचे, ज्यांच्या खांद्यावर वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाची धुरा होती, त्या डॉ. नितीन सावंत यांनी अखेर शरद पवार गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पडलेले हे खिंडार दोन्ही राष्ट्रवादीसाठी 'विघ्न' ठरणार, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
डॉ. नितीन सावंत हे केवळ अध्यक्ष नव्हते, तर मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा कणा होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षातच त्यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचले होते. पक्षात होणारी घुसमट आणि कामात वारंवार आणले जाणारे अडथळे यामुळे सावंत कमालीचे संतप्त होते. निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्ष प्रवेश केल्याने वाईत 'पवार' शक्ती क्षीण आणि भाजपची 'बॅटिंग' जोरात असल्याचे अधोरेखित झाले आहे.
त्यातच डॉ. सावंतांसोबतच त्यांचे निकटवर्तीय आणि वाई शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनीही यापूर्वीच राजीनामा देऊन बंडाचे संकेत दिले होते. त्यामुळे वाई मतदारसंघात शरद पवार गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडली आहे. दुसरीकडे, या प्रवेशामुळे भाजपला 'रेडिमेड' नेतृत्व आणि मोठी व्होट बँक आयती मिळाली आहे.
वर्षानुवर्षे निष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा पक्ष प्रेमाचा दिखावा करणाऱ्यांना महत्त्व मिळत असल्याचा सूर सावंतांच्या समर्थकांमध्ये आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चेहरा शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, ना. मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात डॉ. नितीन सावंतांच्या माध्यमातून भाजपने थेट त्यांच्या 'होम ग्राऊंड'वर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
आता प्रश्न विचारला जातोय तो हाच की ज्या सावंतांनी आयुष्यभर पवारांची भक्ती केली, त्यांना पक्षातून बाहेर पडायला भाग पाडणारे 'ते' अदृश्य हात कोणाचे? आणि आता भाजप डॉ. सावंतांच्या हाती विधानसभेची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कोणती 'ताकद' देणार? याकडे वाई मतदार संघातील जनतेचे डोळे लागले आहेत.
गेल्या काही काळापासून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाची गती पाहता, मला असे वाटते की सत्ताधारी पक्षासोबत राहूनच आपण जनतेची कामे अधिक प्रभावीपणे करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेतृत्व ज्या गतीने विकासकामे करत आहे, त्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय मी घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि तरुणांना न्याय देण्यासाठी भाजप हा एक सक्षम पर्याय आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांना वाटत होते की, आपण अशा ठिकाणी असावे जिथे आपल्या विचारांना आणि कामाला योग्य दिशा मिळेल. त्यांच्याच आग्रहाखातर मी हा जाहीर प्रवेश करत आहे."
- डॉ. नितीन सावंत
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



