डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बैठकीत जोरदार मागणी
शिवशाही वृत्तसेवा, बार्शी
डिजिटल माध्यमांत कार्यरत पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीला बळ देणारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी शाखेची कार्यकारिणी पदग्रहण व ठराव बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकाराचे प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सूर्यकांत वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध स्तरांवरील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत लक्षवेधी ठरलेला मुद्दा म्हणजे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्यावी, अशी ठाम मागणी. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासाठी संघटनेचे सर्व प्रतिनिधी, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पाठपुरावा व मागणी करावी, असा निर्णय घेण्यात आला. डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधित्व विधिमंडळात होणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत बार्शी तालुका कार्यकारिणीची घोषणा करून नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, उपाध्यक्ष अक्षय बारंगुळे, ग्रामीण उपाध्यक्ष भैरवनाथ चौधरी, सचिव शंकर लाखे, खजिनदार विश्वास वीर, संपर्कप्रमुख श्रीशैल माळी, महिला तालुकाध्यक्ष प्रतिज्ञा वाळके यांच्यासह इतर कार्यकारी सदस्यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेच्या विस्तारासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना घ्यावयाची खबरदारी, कायदेशीर बाबी व तांत्रिक अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन करून पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.
बैठकीत सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांबाबतही महत्त्वाचे ठराव मंजूर झाले. ४ फेब्रुवारी रोजी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सुगंधी मसाला दूध वाटप, १९ मार्च रोजी संघटनेचा वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करणे, त्या निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बार्शी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक संघटनेच्या आगामी वाटचालीस दिशा देणारी ठरली. विशेषतः राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याचा ठराव हा पत्रकार वर्गाच्या अपेक्षा व संघटनेची भूमिका स्पष्ट करणारा ठरला, अशी चर्चा बैठकीनंतर पत्रकार वर्तुळात रंगली.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



