संपाला बॅंक कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांचा बँकिंग आठवडा तात्काळ लागू करावा, तसेच इतर दीर्घकाळ प्रलंबित सेवासंबंधी मागण्यांसाठी एकदिवसीय संप पुकारला होता.
या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सुमारे २०० बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी वर्क लाईफ बॅलन्स, कामगारांचा सन्मान तसेच शासन व प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी यासाठी तीव्र घोषणा देण्यात आल्या.
मोर्चादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय अर्थमंत्री, अर्थ मंत्रालय, बँक व्यवस्थापन तसेच संबंधित सर्व निर्णयक्षम यंत्रणांचे लक्ष वेधले. वाढता कामाचा ताण, कर्मचारी कमतरता, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि सातत्याने येणारा मानसिक दबाव यामुळे बँक कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
“५ दिवस बँकिंग ही सुविधा नसून बँक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे नमूद केले. इतर शासकीय व निमशासकीय क्षेत्रांत पाच दिवसांचा कार्यआठवडा लागू असताना बँकिंग क्षेत्राला त्यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून कर्मचाऱ्यांची शिस्त, एकजूट आणि गांभीर्य स्पष्ट झाले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे क्षेत्रीय सचिव सुहास हेंद्रे, हेमंत नागे, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे अध्यक्ष सुनिल शिंदे, सचिव सागर नेवसे, बँक ऑफ महाराष्ट्र स्टाफ युनियनचे ब्रह्मानंद गुजर, बँक ऑफ इंडियाचे प्रसाद किरपेकर, बँक ऑफ बडोदाचे पंकज घोरपडे यांनी संयुक्तपणे आपली भूमिका मांडली. तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्यांनी सांगितले की, भारत डिजिटल झाला असून बँकिंग सेवा २४×७ उपलब्ध आहेत, मात्र बँक कर्मचारी अजूनही जुनाट ६ दिवसांच्या कामकाज पद्धतीत काम करण्यास बाध्य आहेत. सरकारी कार्यालये आणि कॉर्पोरेट क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत आधीच ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्णपणे न्याय्य व फार पूर्वीच मान्य होणे आवश्यक होती.
युनियन प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, ५ दिवसांचा बँकिंग आठवडा लागू केल्यास उत्पादकता कमी होणार नाही, तर उलट कार्यक्षमता, जबाबदारी, कर्मचारी कल्याण आणि ग्राहक सेवा अधिक सक्षम होईल. मात्र सरकार व इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी वारंवार दिलेल्या आश्वासनांनंतरही अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
UFBU ने इशारा दिला आहे की, जर मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
हा संप शांततेत पार पडला. मात्र सरकार व बँक व्यवस्थापनांना एक ठाम संदेश देण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



