दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात आज दुपारी साडे - चारच्या सुमारास इंडिओरा या चारचाकी गाडीचा अपघात होऊन गाडी सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जणाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत. हे सर्वजण लोणी काळभोर ( पुणे ) येथील असल्याचे समजते. महाबळेश्वरवरून वाईला येताना बुवासाहेब मंदिराच्यानजिक, पालखी रस्त्याजवळ हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणी काळभोर तालुका पुणे येथील बजरंग पर्वतराव काळभोर, सौरभ जालिंदर काळभोर, अक्षय मस्को काळभोर, वैभव काळभोर हे सर्व इंडिओररा कार क्र. एम. एच १२ क्यू टी ७७११ या गाडीने कोकणामध्ये फिरण्यासाठी गेले होते. आज सकाळी महाबळेश्वर येथे काहीवेळ फिरून माघारी पुण्याला जात असताना. दुपारी साडेचारच्या सुमारास बुवासाहेब मंदिराच्या खालील बाजूस पालखी रस्त्याच्या नजीक कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला.
थोड्या वेळातच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. शिव सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने व स्थानिक युवक पसरणीचे माजी उपसरपंच विशाल शिर्के, गणेश शिर्के, अजय शिर्के, अमोल महांगडे, प्रवीण शिर्के, आबा होमणे, अक्षय मोहिते, मोहित काकडे आदींनी जखमींना स्ट्रेचरवरून दोनशे फूट दरीतून वरती काढले. जखमींना नजीकच्या बेलेर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची दाट शक्यता प्रत्यक्ष दर्शनी वर्तवली. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी व हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा