सहा महिन्यापासून होते ईडीच्या जेलमध्ये
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित राजकीय व्यक्तिमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिति सभापती मंगलदास बांदल हे सहा महिन्यापासून ईडीच्या जेलमध्ये अटक होते. परंतु त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा यामधील निवडणुकांचे सत्ता समीकरण बदलणार अशी वेगवान चर्चा होत आहे.
पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे त्यामुळे मंगलदास बांदल हे सहा महिन्यानंतर कारागृहामधून बाहेर येणार आहेत त्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मंगलदास बांदल हे आपल्या चाणक्य नितिने राजकीय मैदानात उतरून पुन्हा खळबळ उडून देणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत.
21 ऑगस्ट 2024 रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी कारवाई करीत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते तसेच बांदल यांच्या 85 कोटी किमतीच्या मालमत्ते वर ईडीने टाच आणली होती. मनी लॉन्ड्रींग सह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करण्यात आले होते .यापूर्वीही शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी 21 महिने तुरुंगवास भोगला होता त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यापासून कारावास भोगत आहेत आता जामीन मंजूर झाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
12 मार्च रोजी सायंकाळपर्यंत ते तुरुंगवासातून बाहेर येतील असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे तर शिरूर आणि हवेली तालुक्यामध्ये असणारे पैलवान तसेच मंगलदास बांदल यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे उधान आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मंगलदास बांदल यांचा जामीन होईल अशी चर्चा सर्वत्र होती, त्याप्रमाणे त्यांना जामीन मंजूर झाला आहे. एकूणच आगामी काळामध्ये मंगलदास बांदल हे आपली ताकद नक्कीच पणाला लावतील असे राजकीयजाणकारांचे मत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा