जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे ? जिल्ह्यात चर्चांना उधाण
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
साताऱ्याच्या राजकारणात सध्या 'कधी काय होईल' याचा नेम उरला नाहीये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार, यावरून महायुतीतच सध्या 'कलगीतुरा' रंगलाय. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी भाजपचाच अध्यक्ष होणार असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. थंडीचे दिवस असले तरी सातारच्या राजकीय मैदानातलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय. निमित्त आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्षपदाचं! एकीकडे सोलापूरचे पालकमंत्री जयाभाऊंनी "अध्यक्ष तर भाजपचाच होणार" अशी डरकाळी फोडली असतानाच, दुसरीकडे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपला 'शिवशाही' बाणा दाखवत गट नोंदणीचा धडाका लावलाय. यामुळे महायुतीत 'सख्य' आहे की 'संघर्ष', असा सवाल आता गावकुसात विचारला जाऊ लागलाय.
सातारच्या राजकारणात आकड्यांची गणितं मोठी विक्षिप्त आहेत. वरकरणी भाजप मोठा दिसत असला तरी, सत्तेची 'मॅजिक फिगर' गाठताना सगळ्यांचीच दमछाक होणार आहे. भाजपच्या सत्कार सोहळ्यात जयाभाऊंनी थेट भाजपचाच अध्यक्ष बसवणार असल्याचा दावा केला. पण हा दावा नेमक्या कोणत्या जोरावर? भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी अजूनही आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. खटाव, कराड आणि साताऱ्यात भाजपची ताकद असली, तरी फलटण आणि माण मध्ये मात्र 'चिट्ठी'वर नशीब ठरणार आहे. जयाभाऊंच्या मनात नक्कीच काहीतरी 'ऑपरेशन लोटस' शिजत असावं, अशी चर्चा आता रंगली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आधीच आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांनी झेडपीचा गट स्थापन केला असून, आता पंचायत समितीसाठी वकिलांची फौज कामाला लावली आहे. "एकनाथ शिंदे साहेबांना जिल्ह्यातली खरी परिस्थिती सांगणार," असं म्हणत त्यांनी भाजपला सूचक इशाराच दिलाय. शिवसेनेच्या १५ सदस्यांच्या जोरावर ते सत्तेत मोठा वाटा मागण्याच्या तयारीत आहेत.
सर्वात जास्त लक्ष लागलंय ते राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडे. २० झेडपी सदस्य असूनही ते अजून शांत आहेत. ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना? पडद्याआड नक्कीच काहीतरी मोठी खेळी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र येणार की आपापल्या चुली मांडणार, यावरच सातारचा 'राजमहल' ठरणार आहे. "आमचं ठरलंय" असं म्हणणारे नेते प्रत्यक्षात मात्र एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे. जर तिघे एकत्र आले नाहीत, तर सातारच्या राजकारणात 'चिठ्ठीचा खेळ' कुणाचं नशीब उघडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
थोडक्यात काय तर, जयाभाऊंनी गुगली टाकली असली तरी शंभूराजेंनी फलंदाजीची तयारी जोरात केलीय आणि अजितदादांचे भिडू अजून पॅव्हेलियनमध्येच बसून डाव पाहत आहेत. आता या राजकीय कुस्तीत 'गिरे तो भी टांग उपर' कोण करतंय, हे काळच ठरवेल!
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




