कवी संमेलनाला रसिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, टेंभुर्णी
टेंभुर्णी येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी काव्य पुष्पांजली मंडळ टेंभुर्णी यांनी मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार वितरण, कवी व कथाकार हरिश्चंद्र पाटील यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन व बहारदार कवी संमेलन आयोजित केले होते.
ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गणपत जाधव, माजी प्राचार्य डी के देशमुख, प्राध्यापक शंकर शेंडे, पुण्याचे ज्येष्ठ गजलकार अरुण कटारे, टेंभुर्णीच्या सरपंच सुरजाताई बोबडे उपसरपंच राजश्री नेवसे बाबाराजे बोबडे सतीश नेवसे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
बा.ना. धांडोरे यांच्या माणसातला राजा या कथासंग्रहाला रामचंद्र इकारे यांच्या माणुसकीचं आभाळ आणि अशोक गायकवाड यांच्या जीवनात गहाण या काव्यसंग्रहाला, अशोक कोकाटे यांच्या भुईपाश या कादंबरीला, सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीचा मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच जयवंत पोळ यांना आदर्श वाचक हा पुरस्कार देण्यात आला.
टेंभुर्णी येथील ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या ओवाळणी आणि खरा वारस या दोन कथासंग्रहाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भास्कर बंगाळे यांनी ओवाळणी तर संध्या धर्माधिकारी यांनी खरा वारस या पुस्तकांचे साक्षेपी विश्लेषण केले.
त्यानंतर गझलकार अरुण कटारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात नारायण खरात प्रकाश गव्हाणे रणजीत लोंढे रामचंद्र इकारे अशोक गायकवाड संध्या धर्माधिकारी सुमन चंद्रशेखर सचिन कुलकर्णी भास्कर बंगाळे भास्कर सोनवणे संभाजी आडगळे अशोक कोकाटे हरिभाऊ हिरडे मुकुंदराज कुलकर्णी, नूरजहा शेख, तसेच राज्यभरातून आलेल्या कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
टेंभुर्णी सारख्या निमशहरी भागात साहित्य चळवळ जिवंत ठेवण्याचे अवघड काम हरिश्चंद्र पाटील हे करत आहेत. साहित्यनिर्मिती बरोबरच साहित्य सेवा करत असल्यामुळे त्यांचे कार्य मोठे आहे. असे गौरव उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी काढले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा