८७ दिवसांचा हंगाम, २,लाख ९०हजार ५४० मे.टन गाळप, १०.२९% उतारा, आणि २लाख ९५हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन
शिवशाही वृत्तसेवा, मंनगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ सालच्या ३२ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजताचे मुहूर्तावर होणार असलेची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली. सदरचा सांगता समारंभ कारखान्याचे चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांचे शुभहस्ते व कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. त्याआधी दुपारी ३ वाजता कारखान्याचे संचालक गौडाप्पा गोविंद बिराजदार व त्यांच्या सुविद्य पत्नी यमुना गौडाप्पा बिराजदार या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन शिवानंद यशवंत पाटील म्हणाले, या गळीत हंगामामध्ये कारखान्याने दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ अखेर ८७ दिवसांत २,९०,५४० मे. टनाचे गाळप करुन सरासरी १०.२९% साखर उता-याने २,९५,६५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केलेले आहे. या गळीत हंगामामध्ये सर्वच साखर कारखान्यांना ऊसाची समस्या भेडसावलेली आहे. तरीही इतर कारखान्याच्या तुलनेत संत दामाजी साखर कारखान्याने समाधानकारक ऊस गाळप केले आहे. कारखान्याने ३१ डिसेंबर २०२४ अखेर शेतक-यांची ऊस बिले अदा केली असून, १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ अखेरची तोडणी वहातूक बिलेही अदा केली आहेत. याशिवाय कामगारांचे पगारही महिन्याच्या महिन्याला अदा केले असलेची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सभासद-शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे सहकार्य लाभले असलेचे शेवटी त्यांनी सांगितले. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, सिध्देश्वर आवताडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कारखान्याचे खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा