शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक भोसले यांचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई ते सुरूर रस्त्याच्या रुंदीकरण कामात ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर विविध ठिकाणी योग्य ते दिशादर्शक फलक न लावल्यास शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे तालुका उपप्रमुख विवेक वसंत भोसले यांनी दिला आहे.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून सुरूर पोलादपूर रस्त्याचे काम लवकरच बंद पाडणार आहोत. या रस्त्याच्या कामामुळे वाई, केंजळ, सुरूर या गावांकडे प्रवास करणारे प्रवासी पर्यटक कोमात गेले आहेत. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर जोमात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, वाई तालुक्यातील नागरिक व पर्यटक पूर्वीपासून वाई केंजळ सुरूर मार्गे हायवेला जात असतात.
परंतु सध्या महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मुंबई यांच्या निगराणीखाली सुरूर ते पोलादपूर या रस्त्याचे काम सुरू आहे. केंजळ गाव ते सुरूर या दरम्यान रस्ता एक बाजूला तीन ते चार फूट पोकलेन यंत्राच्या साह्याने खणलेला आहे. प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या गलथान कारभारामुळे, वाहतुकीची एक बाजू चालू आहे. त्यावरच कंत्राटदाराचे डंपर उभे करून खणलेला रस्त्याचा सर्व भाग पोकलेनद्वारे व जेसीबीद्वारे डंपर मध्ये भरला जात आहे. त्यामुळे एकच लेन असल्याने केंजळ ते सुरूर या दोन्ही गावांच्यामध्ये दोन्ही बाजूकडून वाहनांच्या रांगा लागत आहेत. तासंनतास वाहने पुढे सरकत नाहीत, लोकांना माहीत नसल्यामुळे केंजळकडून दोन दोन तीन तीन वाहनांच्या रांगा लागत आहे.
तर सुरूर बाजूकडून वाहनांची तीच परिस्थिती होत आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर व प्रोजेक्ट मॅनेजर यांनी कोणतीही दिशादर्शक फलक या ठिकाणी लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दोन दोन तास वाहनांच्या गर्दीमुळे व अरुंद रस्त्यामुळे वाहक त्रास होत आहे. कला गार्डन व वाठार फाटा या ठिकाणी हायवे ला जाण्यासाठी पाचवड अथवा जोशी वीर रस्त्याचा वापर करावा, असे दिशादर्शक बोर्ड दाखवले तर लोकांना त्रास होणार नाही.
येत्या दोन दिवसात महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ यांनी दिशादर्शक फलक लावले नाही तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. व त्या ठिकाणी चालू असणारे काम बंद पाडण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी़, असाही इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा