पेट्रोल पंपावरील सहजासहजी लक्षात न येणारा मोठा घोटाळा
शिवशाही, विशेष वृत्त (संपादक सचिन कुलकर्णी)
पेट्रोल पंप मालक वाहनधारकांच्या खिशावर राजरोसपणे डल्ला मारत आहेत. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल पंपावर सुरू असलेला हा काळाबाजार सहजासहजी कुणाच्या लक्षातही येणार नाही, परंतु त्यामधून पेट्रोल पंप मालक मोठी माया गोळा करत आहेत.
पेट्रोल पंपावर दोन प्रकारचे ,पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध असते. पैकी साधे पेट्रोल 104 रुपये प्रति लिटर आहे तर पॉवर पेट्रोल 111 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. मात्र बऱ्याचदा वेगवेगळी कारणे सांगून साध्या पेट्रोलच्या ऐवजी पॉवर पेट्रोल ग्राहकांच्या माथी मारले जाते.
दिवसभर नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेले लोक संध्याकाळी घरी जाताना पेट्रोल टाकून जातात. त्यावेळी एकतर ते थकलेले असतात, त्यांना उशीर झालेला असतो, आणि घराची ओढ लागलेली असते. अशावेळी त्या ग्राहकांना साध्या पेट्रोलच्या ऐवजी पॉवर पेट्रोल विकले जात आहे.
हे पेट्रोल विकण्यासाठी कधी, "साधे पेट्रोल संपले आहे", असे सांगितले जाते तर कधी "साध्या पेट्रोलच्या पंपावर कामगार नाही" असे सांगितले जाते. काही पेट्रोल पंप मालक आणि तेथील कामगार तर इतके निर्ढावले आहेत की ते सरळ "रात्री नऊ नंतर साधे पेट्रोल विकले जात नाही, फक्त पॉवर पेट्रोल आहे," असे धमकी वजा सांगतात. आणि गडबडीत असलेले वाहनधारक नाईलाजाने पॉवर पेट्रोल घेतात. पावर पेट्रोलची किंमत जास्त असल्याने स्वाभाविकच पेट्रोल पंप मालकांना जास्त फायदा मिळतो.
साधे पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या किमतीत साधारण सात रुपयांचा फरक आहे. रात्री नऊ नंतर पेट्रोल पंप बंद करेपर्यंत जर शंभर लिटर पेट्रोल विकले तर ग्राहकांना 700 रुपयांचा भुर्दंड पडतो. आणि अशा पद्धतीने महिन्याला पेट्रोल पंप मालक 21000 रुपये जास्तीचे कमवतात. हा हिशोब एका पेट्रोल पंपावरील एका युनिटचा आहे. तर शहरातील सर्व पंपावरील सर्व युनिटचे मिळून किती पैसे होत असतील याचा विचार केला तर सर्वसामान्यांचे डोके चक्रवून जाईल.
सहजासहजी कुणाच्या लक्षात न येणारा हा मोठा घोटाळा आहे आणि थोड्याफार फरकाने तो सर्वच पंपावर आणि सर्वच शहरात सुरू असल्याचे दिसते. खरे तर पेट्रोल पंपावरील कोणते पेट्रोल टाकायचे, हा ग्राहकांच्या इच्छेचा प्रश्न असला, तरी जबरदस्तीने जास्त किमतीचे पेट्रोल ग्राहकांच्या मारण्याचा हा प्रकार संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून थांबवला पाहिजे. आमच्या दर्शकांपैकी कुणाला असा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा, त्यामुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी मदत होईल.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा