सोयाबीन कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती प्रश्नांवर आंदोलन पेटणार
शिवशाही वृतसेवा, सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, यासह शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.उद्या,४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजेपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करणार आहे. तुपकरांच्या या आंदोलनास समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी "चलो सिंदखेड राजा"चा नारा दिला आहे. दरम्यान आंदोलनाकडे शासनाने लक्ष न दिल्यास हे आंदोलन राज्यभर पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार आमचा हा शेवटचा अल्टिमेटम असून जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर मात्र ४ सप्टेंबर पासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मग मात्र ते सरकारला जड जाईल असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला होता. परंतु अद्यापही शासनाने दखल न घेतल्यामुळे आता ते आंदोलन सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकरांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
गेल्या आठवड्यात रविकांत तुपकरांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची हाक दिली होती, त्यावेळी आंदोलनासाठी जात असतांना मरीन ड्राईव्ह परिसरात त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी येथे शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवून आंदोलन केले होते. त्यानंतर आता सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा