वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
शिवशाही वृत्तसेवा, इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे)
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एकका चा उद्घाटन सोहळा दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.सचिन आरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली सन २०२४-२५ राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाची चित्रफित दाखवण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतील माझी जडणघडण या विषयावर विद्यार्थी मनोगत अंकिता लवटे आणि कृष्णा चोपडे यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून निरवांगी गावचे माजी सरपंच, दशरथ पोळ आणि चिखली गावचे माजी सरपंच, विजय पांढरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले तसेच आपले अनुभव व्यक्त करून विद्यार्थ्यांना उत्साहित आणि प्रोत्साहित केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, वीरसिंह रणसिंग हे आवर्जून उपस्थित होते .त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. प्र.प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. आपल्या भाषणात त्यांनी कार्यक्रम अधिकारी असताना झालेल्या कामांची आठवण करून देत विद्यार्थ्यांना समाज सेवेसाठी प्रेरित केले.
उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कपिल कांबळे यांनी केले तर आभार डॉ.अमर वाघमोडे यांनी मानले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष आपले मित्र आहेत त्यांना आपण जपले पाहिजे हा संदेश दिला. याचे महत्त्व पटवून देत कार्यक्रम अधिकारी प्रा.सुवर्णा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेघा रासकर या विद्यार्थिनीने सुंदर अशी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमामध्ये १६० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा