बगाड्या होण्याचा मान अजित महादेव जाधव यांना मिळाला
शिवशाही वृत्तसेवा, वाई तालुका प्रतिनिधी, शुभम कोदे.
कवठे, ता. वाई येथील यंदाची बगाड यात्रा दिनांक २९ आणी ३० एप्रिल रोजी संपन्न होत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी गावाचे पारंपारिक बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यात्रेच्या आदल्या दिनांक २८ रोजी रात्री १२ वाजता भैरवनाथ मंदिरात बगाड्या होण्यासाठी कौल लावण्यात आला यामध्ये अजित महादेव जाधव यांना यंदा बगाड्या होण्याचा मान मिळाला. अजित जाधव हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. पहाटे विधिवत स्नान करून बगाड्याला मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरा समोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण करून पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे पोहोचविला.
कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून या अकरा भावकीच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते यास खुता असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच एकावेळी बारा बैलांनी गाडा ओढला जातो. यंदा विठ्ठलवाडी येथे बगाड पोहोचविण्याचा मान मधुकर डेरे भावकीचा होता.
दुपारी १:३० वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. गाडा प्रथम हलविण्याचा मान यंदा नानासाहेब पोळ भावकीला होता. पाठीमागे भैरवनाथाची पालखी व सुमधुर वाद्यांच्या घोषात ” काशिनाथाचे चांगभले, भैरवनाथाचे चांगभले “ या गजरात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले. यामध्ये ठराविक अंतरा नंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येत होत्या . यामुळे अरिष्ट टळते असे मानले जाते. रात्री सात वाजण्याच्या दरम्यान सदर बगाड यात्रा कवठे गावात येवून निर्विघ्न पार पडली. बगाडयास भैरवनाथ मंदिरात नेवून त्याच्या हस्ते विधिवत भैरवनाथाची पूजा करण्यात आली व भैरवनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या या यात्रेमध्ये रात्री छबीन्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आले होते . यात्रेच्या दुस-या दिवशी दि .३० रोजी मनोरंजना साठी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. चांदीची गदा, मानाच्या ढाली तसेच विविध चार लाखापर्यंत इनामांच्या कुस्त्यांच्या फडाचे आयोजन यात्रा कमिटी मार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांसमवेत जंगी फडाचे आयोजन यात्रा कमिटी मार्फत करण्यात आले असून महिलांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा