मंगळवारी रात्री साडे आठ ते ९ च्या दरम्यान घडली दुर्घटना
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील जावला बाजारातील चार दुकानांना या मंगळवारी रात्री साडे आठ ते ९ च्या दरम्यान आग लागून चार दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत चौघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
औंढा नागनाथ आणि वसमत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली, मिळालेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील बसस्थानक संकुलात पटेल कॉम्प्लेक्स आहे. येथे अनेक दुकाने भाड्याने आहेत. मंगळवारी रात्री अनेक दुकानदार दुकाने बंद करून घरी गेले. रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान एका दुकानातून अचानक धूर येऊ लागला. हा प्रकार तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने इतर लोकांना माहिती दिली. काही वेळातच एका दुकानातून इतर दुकानांमध्येही धुराचे लोट दिसू लागले. पटेल कॉम्प्लेक्समधील दुकाने जळून खाक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी औंढा नागनाथ व वसमत नगरपालिकेशी संपर्क साधल्यानंतर तेथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाठवण्यात आल्या. सुमारे तासाभरात कर्मचाऱ्यांनी अग्निशमन गाड्या घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली.
या आगीत त्र्यंबक चव्हाण यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकान, ज्ञानेश्वर चव्हाण यांचे ग्राहक सेवा केंद्र, रामा संतक्का यांचे सलूनचे दुकान आणि श्रावण बाळकर यांचे फर्निचर व होम डेकोरेशनचे दुकान जळून खाक झाले. या आगीत चार दुकानांचे नुकसान झाले आहे. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत चार दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर आल्याने इतर दुकानांचे नुकसान झाले नाही. आग सुरू असताना जोरदार वाऱ्यामुळे आग विझवताना कामगारांना अडचणींचा सामना करावा लागला. आज सकाळी औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जाळपोळीची माहिती गोळा करून पंचनामा केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा