पावसाळ्यात वनविभाग करणार हजारो वृक्षारोपण
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ - पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागातर्फे रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. रोपवाटिकेत विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली असून, ती रखरखत्या प्रखर उन्हात हिरवीगार दिसत आहे.
या तयार केलेल्या रोपवाटिकेत आंबा, साग, लिंब, करंजी, आवळा, अंजीर, रामफळ, फणस, सीताफळ, चिंच, चाफा, पारिजातक, उंबर, पिंपळ, बहावा, गुलमोहर, काटशेवरी, उंबर, कढीपत्ता, बोर, बांबू, शिशू यासह विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. ही रोपे कापडी पिशव्यांच्या बाहेर आली असून, रखरखत्या उन्हामध्ये रोपामध्ये खुरपणी करून त्यांना पाणी देण्याचे काम महिला मजूर करत आहेत. या वृक्ष रोपट्यांची पावसाळ्यामध्ये वन विभागामार्फत लागवड केली जाणार आहे. उन्हाचा पारा वाढला असल्यामुळे कोवळी रोपे करपून जाऊ नयेत, म्हणून रोपवाटिकेवर हिरव्या जाळीचे आच्छादन करण्यात आले आहे.
विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे, वनपाल संदीप वाघ, वनरक्षक सुधाकर चोपडे, नारायणराव घोगडे, वनमजूर विलास चव्हाण, सुभाष काळे, गोपाळराव टोम्पे आदी रोपवाटिकेत काम पाहत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा