पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - एप्रिल महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
५ एप्रिल रोजी संत नामदेव संस्थान उत्सव नर्सी नागनाथ, ६ एप्रिल रोजी शब-ए-कद्र (बडीरात), ८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा व डॉ. हेडगेवार जयंती, १० एप्रिल रोजी रमजान ईद, महात्मा ज्योतीबा फुले जयंती, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १७ एप्रिल रोजी श्रीरामनवमी व इतर कार्यक्रम सुरु आहेत. जिल्ह्यात व्हीव्हीआयपी व स्वरक्षित व्यक्ती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतात.
तसेच अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात २ ते १७ एप्रिल पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा