अंजना पळशी प्रकल्पाची सुरक्षा व सूचना व्यवस्था रामभरोसे असल्याने अशा घटना वारंवार घडत असतात
शिवशाही वृत्तसेवा,छत्रपती संभाजीनगर कन्नड जिल्हा प्रतिनिधी, मिलिंद कुमार लांडगे
तालुक्यातील पिशोर येथील अंजना पळशी मध्यम प्रकल्पात एक मुलगा बुडून मरण पावल्याची घटना घडली. अनस अर्षद पठाण (वय १२) असे मृत्युमुखी मुलाचे नाव आहे.
पिशोर पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजना पळशी मध्यम प्रकल्पात सध्या पाणी कमी असल्याने अनस हा दुपारी तीन वाजता इतर चार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. इतर मुले मध्यम
प्रकल्पातून गेलेल्या जुन्या रस्त्याजवळ पोहत होते. त्याचवेळी अनस मात्र पोहत पोहत पुढे गेला. प्रकल्पात असलेल्या एका जुन्या विहिरीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला. इतर मित्रांनी तिथून तात्काळ निघून ही घटना जवळ असलेल्या मच्छिमार कोळी बांधवांना सांगितली. काही मच्छीमारांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
संध्याकाळी आठ वाजता दहा जणांच्या रेस्क्यू टीमने शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु रात्री दहा वाजेपर्यंत अनसचा शोध लागला नव्हता. गुरुवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू टीम मार्फत त्याचा शोध घेण्यात आला. सकाळी आठ वाजता रेस्क्यू टीमला अनसचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर येथील मुस्लिम दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजना पळशी प्रकल्पाची सुरक्षा व सूचना व्यवस्था रामभरोसे असल्याने अशा घटना वारंवार घडत असतात. या प्रकल्पाच्या पाळूवर कुणी ही या आणि धरणात उड्या मारा असेच सुरू असल्याने या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकल्पाची सुरक्षा व सूचना व्यवस्था याकडे प्रकल्प अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. यापुढे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी लक्ष देईल का? अथवा यानंतरही पुन्हा पुन्हा अशा दुर्दवी घटना घडत राहतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा