अपघातात बस चालकाचा मृत्यू तर दोघे जखमी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री बस, ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक जागीच ठार झाला असून ट्रक व ट्रॅक्टर चालक जखमी झाले आहेत.
रविवारी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाट्याजवळ बस, ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांचा जोरदार अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की बस चालक केबिनमधून उडून बाहेर पडला.
या अपघातात एनडब्ल्यूकेआरटीसीची बस (क्रमांक KA 22 F 2078) चालक वीरपक्षी एस. मटद (वय ४७, रा. सप, ता. बेल हगल, जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक (क्रमांक MH 09 GJ 8182) चालक मनोज बाबू उतरे (वय ५२, रा. बोरगाव बये इस्लामपूर, ता. वाळवा) आणि ट्रॅक्टर चालक जखमी झाले असून त्यांना सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महामार्ग पोलीस अधिकारी एपीआय बी. सी. वंजारी तसेच सातारा कंट्रोलचे एपीआय एन. जी. केणेकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास भुईज पोलीस करीत आहेत.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



