खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली,दि.१४ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सिंचन क्षमतेची तफावत भरून काढण्याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचा १५ हजार १६० हेक्टर क्षेत्राचा सिंचन अनुशेष मंजूर केला असून, यामध्ये जलसंपदा विभागाच्या ८९८९ हेक्टरच्या योजना व उर्वरित क्षेत्राकरिता जलसंधारण विभागाच्या सिंचन योजना द्वारे दूर करण्यात येणार आहे. याद्वारे जलसंपदा विभागामार्फत ५ चालू व ३ भविष्यकालीन अशा आठ लहान मोठ्या साठवण तलाव व पूर्णा नदीवरील तीन बंधाऱ्याद्वारे जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, पूर्णा नदी जिल्ह्यात येलदरी धरणापासून सुरू होते. ती परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गोदावरी नदीला जाऊन मिळते साधारणतः ५०५५ किलोमीटर नदीचा प्रवाह हिंगोली जिल्ह्यातून वाहतो आणि यामुळे जिल्ह्यातील साधारणतः ९६ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश पूर्णा उपखोऱ्याचा आहे. जिल्ह्यात पूर्णा नदीवर येलदरी हे धरणाच्या ९३४.४४ दलघमी पाणीसाठा व सिद्धेश्वर हे धरणाच्या २५०.८५ दलघमी पाणीसाठा द्वारे ९७००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरिता २ धरणे बांधण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या सिंचनाचा बहुतांश उपयोग हा परभणी जिल्ह्याला होत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाखालील बहुतांश भाग हा सिंचनापासून वंचित राहिला आहे.
सिद्धेश्वर धरणापासून ते परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गोदावरी संगमा पर्यंत सिंचनापासून दूर राहिलेल्या भागाकरिता हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पूर्णा नदीवर सन २०२३-२४ या वर्षात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्णा नदीवरील हिंगोली जिल्ह्यातील तीन उच्च पातळी बंधाऱ्यांना नव्याने ७३९.८२ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बंधाऱ्याच्या कामाची ई-निविदा प्रकाशित करण्यात आलेली असून, निविदा निश्चित पूर्ण होताच कामे हाती घेतली जाणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
औंढा तालुक्यातील पोटा उच्च पातळी बंधारा प्रकल्पाद्वारे ९.५७ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून, याद्वारे जोडपिंपरी, धार ,गोजेगाव, भगवा, साळना, अनखळी, पोटा बु्, माथा, अंजनवाडा, पोटा खुर्द या 13 गावातील १ हजार ४२९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. वसमत तालुक्यातील जोड परळी उच्च पातळी बंधारा प्रकल्पाद्वारे ९.७५ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून याद्वारे परळी (काळे) पिरजाबाद, नांदखेडा, बेरुळा, परळी (दशरथे), तपोवन, अजरसोंडा, मालेगाव, पेरगव्हाण, टाकळगव्हाण या 10 गावातील १ हजार ४३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच तालुक्यातील पिंपळगाव कुटे या उच्च पातळी बंधाऱ्याद्वारे ८.९४ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून याद्वारे देवठाणा, पिंपळगाव टोंग, संबर, सांगवी खु, टाकळी बोंबळे, माटेगाव, देऊळगाव, सावंगी बु., ब्राम्हणगाव बु., सोना, सुकापूरवाडी, पिंपळगाव या १३ गावातील १ हजार ३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
असे एकंदरीत औंढा, वसमत तालुक्यातील 36 गावांना ४ हजार २१९ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ मिळणार असून, पुढील तीन वर्षात हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी दहा प्रकल्पाच्या निर्मितीवर १०६१.७८ कोटी रुपयाचा खर्च करून ८४७३ हेक्टर सिंचन निर्मिती केली जाणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. असे म्हणताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्याने खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभेचा जनसेवक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
--
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा