दुसर बीडच्या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे कडाडल्या
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
शेतकऱ्याने घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाला सध्या भाव नाही. त्यातच देशाचा बळीराजा सुलतानी व अस्मानी दोन्ही संकटाचा मुकाबला करीत असतांना मेटाकुटीस आला आहे. सोयाबीनचे भाव ४ हजारावर तर कापूस ६ हजारावर एक डीएपीची बॅग मात्र १७०० रुपयाला शेतकऱ्याला घ्यावी लागते, वाढता उत्पादन खर्च पाहता शेती परवडेनाशी झाली आहे. अशी परिस्थीती असतांना सरकार मात्र त्यांच्या मालाला भाव व अतिवृष्टिची नुकसान भरपाई देत नाही, सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नसून ते फक्त शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दुसरबीड येथे मातुतिर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजीत सभेत बोलतांना केले. यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख जालीदर बुधवत, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना उपनेत्या गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंदखेड राजा मतदार संघात आमदार ते अनेकवेळ मंत्री राहीलेल्या आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी किती विकास केला. साखर कारखाना बंद, सुतगिरण्या बंद, माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थळचा अद्यापही विकास आराखडा मंजूर करून घेता आला नाही, खासदार जाधव व दोन गद्दार आमदारांना शिवसेनेने सर्व काही दिले, मात्र या तिघांनी मतदार संघात कोणते उद्योग आणले, किती तरूणांना रोजगार दिला, काय विकास केला.? असे अनेक सवाल उपस्थित करून सुषमा अंधारे यांनी टिका केली आणि विकासाचा विचार करून यांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन केले.
प्रास्तविकात नरेंद्र खेडेकर यांनी परिसरातील समस्याचा पाढा वाचून दाखविला तर मनोगत व्यक्त करताना शिवसेना उपनेत्या सौ गायकवाड यांनी शिवसेना फोडून चाललेल्या सरकारच्या कारभारावर प्रखर टीका केली.
पुढे बोलतांना सुषमा आंधारे म्हणाल्या की, संकटाचा सामना करताना शेतकऱ्याला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतो, हे एक दुर्दैव असून शासनकर्ते एकमेकाची उणी-दुणी काढण्यात व्यस्त आहे. ईडी, सीबीआय ज्याच्या मागे लावल्या, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांचेच लाड पुरवण्यात गुंतलेली आहे. युवकांना नोकरी नाही, कर्मचारी जुनी पेन्शनची मागणी करतात, अंगणवाडी मदतनीस, सेविका यांच्याबाबत विचार नाही, यासह अनेक प्रश्न असतांना फक्त दडपशाही व हुकूमशाहीचे राजकारण चालू आहे. खोके सरकार गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचे सरकार नाही त्यामुळे यांना येणाऱ्या काळात जनता घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
गद्दारी करून यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह उध्दव साहेबांकडून हिसकावून घेतले. कुठेच न्याय मिळत नाही म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागीत आहोत. येथे त्यांचे काहीच चालणार नाही व जनताच आता खरा न्याय करेल जोपर्यंत इमानदार शिवसैनिक सोबत आहे, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. या गद्दारांना शिवसेनेने सर्व काही दिले तरीही कपटनीतीने उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले, त्यामुळे हे सुध्दा आता निवडून येणार नाही असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. यावेळी असंख्य शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते.
.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा