माजी मुख्यमंत्री तथा लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज २३ फेब्रुवारीच्या पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.
शुक्रवारी दुपारी नंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा