रजनीताई सातव यांचे समाजातील प्रत्येक घटकाविषयी आपुलकीचे नाते
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली, दि.१९(प्रतिनिधी) ः माजी मंत्री रजनीताई सातव यांचे समाजातील प्रत्येक घटकाविषयी आपुलकीचे नाते होते. मी हिंगोली शहरात समाज कल्याणच्या शासकीय वसतीगृहात असताना विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात होते. या विरोधात मी आंदोलन केले होते. त्या वेळी हिंगोलीचे तत्कालीन नगरसवेक बाळासाहबे आनेवार यांनी आम्हाला रजनीताई सातव यांची भेट घडवून आणली तेव्हा रजनीताई सातव आणि माझा प्रत्यक्ष संबंध आला आम्हा विद्यार्थ्यांची बाजू ऐकुन घेऊन तत्कालीन वसतीगृहाचे वार्डन यांना बडतर्फ करून आम्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला होता. आज त्यांच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना माजी मंत्री रजनी सातव यांच्या विषयी आठवणींना उजाळा दिला.
प्रकृती अस्वस्थ असल्याने माजी मंत्री रजनीताई सातव यांना रविवारी (दि.१८) नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रजनी सातव यांनी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१९) दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . रजनीताई सातव या दिवंगत खासदार ऍड. राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या.हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याबदद्ल आठवणींना उजाळा देतांना म्हणाले की, रजनीताई सातव ह्या काॅग्रेस पक्षाच्या नेत्या असल्या तरी, त्यांना समाजातील प्रत्येक घटकाबद्दल अपुलकिची भावना होती. त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. म्हणून त्या समाजातील प्रत्येक घटकांच्या मनातील नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा