लोणार सरोवर, सिंदखेड राजा, शेगाव आणि विवेकानंद आश्रम या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
हिवरा आश्रम येथे गेल्या काही वर्षांपासून कामाची व्यस्तता कमी करण्यासाठी व सुटीचा आनंद घेण्यासाठी लोकांनी पर्यटनाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भेटीसाठी आनंद देणारे पर्यटनस्थळे निवडणे व याठिकाणी वेळ घालविणे हा ट्रेंड जनमाणसात रूजत आहे. बुलडाणा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने फारसा विकसीत झालेला नव्हता. अलिकडच्या काळात मात्र मानसिक आनंद लुटतांना विदेशी पर्यटक जिल्हयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील लोणार सरोवर, सिंदखेड राजा, शेगाव आणि विवेकानंद आश्रम या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. हिवरा आश्रमला असलेले विवेकानंद स्मारक, शिव उद्यान व हरिहरतीर्थाला भेट देण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयाच्या सहली, भाविक व पर्यटक प्रामुख्याने सुटीच्या दिवशी गर्दी करीत असतात.
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी भेट देणाऱ्यांमध्ये विदेशी पर्यटक आढळून येत आहे. समृध्द निसर्ग, कोराडी धरणात नयनरम्य विवेकानंद स्मारक, बोटिंगचा प्रवास हे सगळ पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत आहे. अंजिठा, वेरूळ नंतर लोणारला जाणारे विदेशी पर्यटक रस्त्यावरच असलेल्या हिवरा आश्रम या ठिकाणी भेट देत आहे. हिवरा आश्रम मोठे शैक्षणिक केंद्र असून अलिकडच्या काळात पर्यटनक्षेत्रातही नावारूपाला आले आहे. पर्यटकांना मिळणारी आदराची, स्नेहाची वागणूक निसर्ग व पर्यटनासोबतच त्यांना मानसिक आनंदाचीही अनुभूती देत आहे.
जिह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यास रोजगार निर्मिती वाढेल. हाताला काम मिळेल त्यासाठी शासन व प्रशासनाने पुढाकार घेणे गरजचे आहे. लोणार सारखे जगप्रसिध्द ठिकाण असूनही केवळ शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षीतेमुळे सोयी व सुविधांच्या अभावामुळे हवे तसे विकसीत झाले नाही. जिल्ह्याला लाभलेला, ऐतिहासिक, पौराणिक व आध्यात्मीक वारसा जतन करून तो पर्यटनाच्या रूपाने लोकांपर्यत जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हिवरा आश्रम सारख्या छोटया गावात संस्थेच्या प्रयत्नाने विकसीत झालेली पर्यटन स्थळे ही काही दिवसात असंख्य विदेशी पर्यटकांच्या भेटीने गजबजून जाईल यात आश्चर्य वाटायला नको.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा