सुपा येथे भगव्या वादळाचे भव्य स्वागत - जेसीबीतून केला फुलांचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
शासनाला सात महिन्याचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचा निर्धार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील केला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुसिंग पवार मैदानावर भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबी वरून फुलांचा वर्षाव, पारंपारिक वाद्य, तसेच डीजेचा दणदणाट आणि एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की मी तुमच्या जीवावर मुंबईकडे कूच करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी गुलाल घेऊनच घरी येईल. मी मरणाला भीत नाही,
आता माघार नाही सरकारने अनेक प्रयत्न केले पण मी मॅनेज होणाऱ्यातला नाही आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही अर्धी लढाई आपण जिंकलो आहे आता फक्त थोडी लढाई बाकी आहे माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेल किंवा नसेल, तुम्ही मात्र एकत्र राहा, असे आवाहन केले पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 170 एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था तसेच चहापाणी फराळ जेवण तसेच फळे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एक मराठा कोटी मराठा घोषणांनी परिसर दणाणून गेला सायंकाळी उशिरा शिरूरच्या दिशेने पदयात्रेचे प्रस्थान झाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा